नागपूर : पश्चिम बंगालसह आसाम व पुद्दूचेरीमधील भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. एवढेच नव्हे विरोधकांना डिवचण्याची संधीही भाजप नेत्यांना मिळाली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सकाळी राज्यातील विरोधक २०४७ पर्यंत घरी बसतील, असे भाकीत वर्तवले.

महसूलमंत्री व नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज, मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता मुंबईला रवाना होण्यापूर्वी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. बंगालमधील भाजपच्या अभूतपूर्व यशावर ते बोलत होते. ते म्हणाले बंगालमधील जनतेने विकासाला मतदान करून ममता बॅनर्जी यांच्या ‘थर्ड डिग्री’ राजकारणाला उद्ध्वस्त केले. देशातील जनता विकासाच्या बाजूने आहे. महाराष्ट्रातील विरोधकांनी यापासून धडा घेतला पाहिजे. विशेषतः काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या सेनेने आता स्वतःच्या पक्षात सुधारणा केली पाहिजे, अन्यथा हे पक्ष २०४७ पर्यंत घरी बसतील. महाराष्ट्रातील जनताही आता विकासाच्या बाजूने आहे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी बंगालमधील विजयाचे गुपितही सांगितले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी अनेक भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली. त्यामुळे तेथील जनतेलाही सुशासन आले पाहिजे, असे वाटत होते. त्याचा परिणाम मतपेटीत दिसून आला, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथील अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशीसाठी सरकार प्रयत्न करणार असून कुटुंबाला न्याय दिला जाईल, असे सांगितले.

‘डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या विचारांना जनतेची साथ’

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचे प्रत्यक्ष रूप पश्चिम बंगालमधील अभूतपूर्व विजयातून दिसून येत आहे. प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीमुळे तेथे परिवर्तनाची नवी दिशा मिळाली आहे, असे काल, सोमवारी विजयाचा जल्लोष करताना सोमवारी बावनकुळे म्हणाले होते.

३७० कलम असो किंवा राष्ट्रवादाचा मुद्दा — डॉ. मुखर्जी यांच्या दूरदृष्टीने आज देशाला आणि पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७च्या विकसित भारताचे स्वप्न समोर ठेवत देशाला दिशा दिली असून, त्याच मार्गाला प. बंगालमधील जनतेने कौल दिला आहे. भयमुक्त आणि सुरक्षित प. बंगालचा नारा स्वीकारत जनतेने भाजपच्या बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांना साथ दिली. गृहमंत्री अमित शाह यांच्या कणखर राजकीय धोरणांचा हा विजय असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले. आसाममध्ये हेमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला, तर पुद्दुचेरीमध्येही एनडीएला निर्णायक बहुमत देत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, अमित शाह यांचे मार्गदर्शन आणि पक्ष संघटनेच्या एकजुटीमुळे कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून हा ऐतिहासिक विजय साध्य झाला असल्याचे सांगत बावनकुळे यांनी आता देशाच्या विकासाला आणखी गती येणार असल्याची पुस्ती जोडली.