राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत बोलताना मला माझ्या राज्यात परत जायचं म्हणतात, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना केले होते. दरम्यान, अजित पवारांच्या या विधानावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी अजित पवारांना हे नेमकं कधी सांगितलं, हे त्यांनी आधी सांगावं. उगाच खोटं बोलून नये, अशा प्रकारे बोलून ते स्वत:ची उंची कमी करून घेत आहेत, असे ते म्हणाले. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी यांसदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – प्रत्येक तालुक्यात हेलीपॅड उभारण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश; वैद्यकीय मदतीसाठी होणार उपयोग

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

“राज्यपालांना परत जायचं आहे, याबाबतीत ते माझ्याशी बोलले, अशा प्रकारे अजित पवार यांनी बोलू नये. त्यांची आणि राज्यपालांची भेट नेमकी कधी झाली. हे त्यांनी आधी सांगावं. राज्यपालांबाबत असं खोटं बोलणं योग्य नाही. अजित पवार हे चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. अशा प्रकारे बोलून ते स्वत:ची उंची कमी करून घेत आहेत. त्यांनी उंचीचा विचार करून आणि भान ठेवून बोलले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

“राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्यांनी शिवरायांबाबत केलेले विधान योग्य नाही. हे सर्वांनी मान्य केले आहे. त्यांच्या विधानाचे कोणीही समर्थन करत नाही. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून ज्याप्रकारे त्यांच्याबाबत बोलण्यात तेही बरोबर नाही”, असेही ते म्हणाले.

“राज्यपाल महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच काम सुरू केलं होते, हे त्यांनी अनेकदा त्यांच्या वागण्यातून दाखवून दिले आहे. स्वत: ते शिवनेरी गडावर जाऊन आले, त्यांनी अनेकदा शिवजयंतीच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यामुळे एका विधानावरून त्यांच्या वयावर त्यांच्या, वृद्धावस्थेवर बोलण्यात आलं, हे योग्य नाही. यापुढे कोणीही अशा प्रकार बोलू नये”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावर बोलताना आज अजित पवारांनी जोरदार टीकेली होती. “राज्यपालांच्या वक्तव्यावर आम्ही तातडीने प्रतिक्रिया दिल्या. मी तर २४ तासाच्या आत ट्वीटही केलं होतं, नंतर मला माझी भूमिका स्पष्ट करायची होती तीही सांगितली. परंतु, माझं पुन्हा पुन्हा सर्वांना सांगणं आहे की, बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न आपण बाजूला ठेवतो आणि असे गरज नसलेले प्रश्न निर्माण करतो. हे थांबवलं पाहिजे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत म्हणतात की, मला आता माझ्या राज्यात परत जायचं आहे. मग ते काही कारण आहे की काय हेही कळायला मार्ग नाही. या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं लंगडं समर्थ करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कोणत्याही व्यक्तीने अशाप्रकारे वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्र ते खपवूनही घेणार नाही,” असे ते म्हणाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule reaction on ajit pawar statement on governor bhagat singh koshyari spb
First published on: 28-11-2022 at 19:12 IST