नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यपद्धती, संस्कार आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाबाबत माजी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वादात आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघडपणे त्यांची बाजू घेतली आहे. नांगरे पाटील यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांच्या वैयक्तिक अनुभव, विचार आणि संस्कारांचे प्रतिबिंब असून त्याचा विपर्यास करून राजकीय वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

नांगरे पाटलांच्या समर्थनार्थ भूमिका

लोकसत्ताने दोन दिवसांपूर्वी नांगरे पाटील यांच्या वक्तव्यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर या मुद्द्याला राजकीय रंग चढला. या पार्श्वभूमीवर नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी नांगरे पाटील यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. विश्वास नांगरे पाटील हे केवळ माजी पोलीस अधिकारी नाहीत, तर त्यांच्या शिस्तप्रिय, अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्वामुळे समाजात त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांनी आरएसएसबद्दल जे गौरवोद्गार काढले, ते कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर त्यांनी अनुभवलेल्या संस्कारांमधून आले आहेत. देशासाठी काम करणाऱ्या संस्थेबद्दल सकारात्मक मत व्यक्त करण्यात काहीही गैर नाही, असे बावनकुळे म्हणाले.

सोयीने अर्थ लावू नका

राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना बावनकुळे म्हणाले, कोणत्याही व्यक्तीच्या वक्तव्याचा आपल्या सोयीने अर्थ लावणे योग्य नाही. प्रत्येकाला आपल्या विचारांनुसार मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नांगरे पाटील यांनी जे मत मांडले, ते त्यांच्या वैयक्तिक भूमिकेचा भाग आहे. त्यावरून अनावश्यक राजकीय वाद निर्माण करण्याऐवजी त्यामागील संदर्भ समजून घेण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून नांगरे पाटील यांच्या वक्तव्यावरून सामाजिक माध्यमांसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. संघाच्या कार्याबाबत केलेल्या त्यांच्या सकारात्मक टिप्पणीचे काहींनी स्वागत केले, तर काहींनी त्यावर टीका केली. मात्र, या वादात भाजपकडून पहिल्यांदाच वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट समर्थन मिळाल्याचे मानले जात आहे.

समाजात ध्रुवीकरण टाळण्याचे आवाहन

बावनकुळे यांनी यावेळी समाजात अनावश्यक ध्रुवीकरण टाळण्याचे आवाहनही केले. एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेल्या मतावरून समाजात तेढ निर्माण होईल किंवा राजकीय संघर्ष वाढेल, अशी भूमिका कुणीही घेऊ नये. लोकशाहीत मतभिन्नता असू शकते; मात्र त्याचा विपर्यास होऊ नये, असे ते म्हणाले. नांगरे पाटील यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या चर्चेत बावनकुळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा वाद आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.