अकोला : भाजप सरकार चांगले काम करीत असून काँग्रेसची स्थिती अत्यंत वाईट झाली. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडली. प्रत्येक जिल्ह्यात अनेक जण काँग्रेस सोडत आहेत. काँग्रेसमध्ये राम राहिलेला नाही. काँग्रेस पक्षातील नेते, प्रदेशाध्यक्ष एकमेकांचे काय, तर राहुल गांधींचेही तोंड पाहत नाहीत, अशी खरमरीत टीका महसूलमंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशीम येथे आज केली.

वाशीम नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळ व सदस्यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद सभेत ते बोलत होते. माजी मंत्री संजय कुटे, उमेदवार अनिल केंदळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्र व राज्य शासनाची मांडून विरोधकांवर टिकेचे बाण सोडले.

पुढे बावनकुळे म्हणाले, ‘विकसित वाशीम’ची संकल्पना प्रत्यक्षात आणल्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आल्यानंतर पहिल्याच बैठकीत शहराचा विकास आराखडा मंजूर करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आवश्यक निधी मंजूर करून आणण्याची जबाबदारी आपलीच राहील.

महिला सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण’ आणि ‘हिरकणी’ योजना सुरूच राहील. पुढील पाच वर्षांत ५०० महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. शहरातील विविध वसाहतींमध्ये तुकडेबंदीमुळे प्रलंबित असलेले सातबारा, मालकी हक्क व घरपट्टी प्रश्न ड्रोन सर्वेक्षणाद्वारे निकाली काढण्यात येणार आहे. या सर्व विकासात्मक मुद्द्यांवरच ही निवडणूक लढवली जात असून, मतदारांचा कौल वाशीमच्या भविष्याची दिशा ठरवेल, असे बावनकुळे म्हणाले.

रुई गोस्ता येथे प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकलामुळे सव्वा चार लाख हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे. नव्याने उद्योग धोरण तयार केले जात आहे. यामध्ये विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. वैनगंगा नळगंगा योजनेत वाशीम जिल्हा असल्यामुळे शेती आणि उद्योग व्यवसाय समृद्ध होईल, असा विश्वास संजय कुटे यांनी व्यक्त केला.

निवडणूक सत्तेची नव्हे, तर भविष्यासाठी निर्णायक

नगरपालिका निवडणुकीत २२ विकास योजनांचा मुद्दा केंद्रस्थानी आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरासाठी मागासवर्गीय, ओबीसी, गरीब घटक, महिला, शेतकरी तसेच सार्वजनिक विकासाशी संबंधित तब्बल १२४ ते १२५ उपयोजनांचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सत्तेची नसून वाशीमच्या भविष्यासाठी निर्णायक आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.