यवतमाळ : रविवारी वर्धा जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी हिरव्याकंच शेतात नेल्यामुळे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सोमवारी बरीच खबरदारी घेतली. यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यादरम्यान महागाव तालुक्यातील धनोडा येथे एका शेतात त्यांनी आकस्मिक भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी करपून गेलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. नियोजनात नसलेल्या या अनपेक्षित भेटीने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. एनडीआरएफकडून मदत मिळवण्यासाठी अचूक पंचनामे अत्यंत महत्त्वाचे असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीचे नियोजन सरकार करत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पंचनामे अचूक व्हावे यासाठीच प्रवास
शेताच्या बांधावर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा पहिला हक्क सरकारवर आहे. अचूक पंचनामे झाले तरच शेतकऱ्याला योग्य मदत मिळू शकते. मंत्रिमंडळ उपसमितीला दुष्काळी स्थितीचे वास्तव विवरण सादर करायचे असून, त्यासाठीच आमचा हा दौरा सुरू आहे. उपसमितीच्या प्रत्येक मंगळवारी होणाऱ्या बैठकीत राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला जाईल. संपूर्ण अहवाल आल्यानंतरच मदतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल; अन्यथा घाईगडबडीत शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती असते. बागायतदार व इतर पिकांचे वेगवेगळे निकष आहेत, त्या सर्वांचा विचार केला जाईल.’
दुष्काळावर राजकारण नको, सर्वांनी मदतीचा हात द्यावा
विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीका करताना त्यांनी स्पष्ट केले की, दुष्काळासारख्या गंभीर संकटावर राजकारण करणे चुकीचे आहे. शेतकरी आणि शेतमजूर आज अडचणीत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन दुष्काळाच्या झळा समजून घेतल्या पाहिजेत आणि आपापल्या परीने मदत निधीत योगदान दिले पाहिजे.
वीज पुरवठा व पीक विमा प्रश्नावर रोखठोक
महावितरणला १२ तास वीज पुरवठा करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. पुरेशी वीज मिळाली तर उपलब्ध पाणीसाठ्यातून शेतकरी पिके वाचवू शकतात. जिथे वीज मिळत नाही, त्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा केली जाईल. तसेच, यवतमाळ जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न केंद्र सरकारकडे मांडण्यात आला असून प्रशासकीय त्रुटी किंवा काही चुका आहेत का, याची सखोल तपासणी केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांच्या पत्रावर व ठाकरेंच्या मोर्च्यावर भाष्य
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्रावर बोलताना ते म्हणाले, ‘विरोधी पक्ष म्हणून पत्र देणे हे त्यांचे कामच आहे. केवळ पवार साहेबांनी पत्र दिले म्हणून आम्ही पावले उचलत आहोत असे नाही; तर सत्ताधारी व विरोधी अशा तिन्ही पक्षांच्या नेत्यांची आणि आमदारांची दोन हजारांहून अधिक पत्रे सरकारकडे आली आहेत. मुख्यमंत्री स्वतः बांधावर गेले असून त्यांनी निर्णय घेतले आहेत. जे तालुके सुटले आहेत, त्यांचाही अभ्यास केला जाईल.’
ठाकरे बंधूंच्या मोर्च्यावर टीका करताना बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे. आधी त्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली, आता एसआयआरवर आक्षेप घेत आहेत. हे लोक बूथ स्तरावर काम करत नाहीत, फक्त शंका घेतात आणि नकारात्मकता पसरवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात. लोकसभेत ‘संविधान बदलणार’ असा खोटा प्रचार केला, पण आता लोकांना ते समजले आहे. म्हणूनच विधानसभेत भाजपला ५१ टक्के मतदान मिळाले आणि काँग्रेस आता घरी बसली आहे. खोटारडेपणा आता चालणार नाही,’ असे ते म्हणाले.
भूदान जमिनीची एस आयटी चौकशी
राज्यातील भूदान जमिनींच्या गैरव्यवहारावर बोलताना महसूल मंत्र्यांनी मोठी घोषणा केली. भूदान जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाला आहे. भूदान यज्ञ मंडळाला जमीन वाटपाचे अधिकार असले तरी अंतिम मंजुरीचे अधिकार सरकारकडेच आहेत. यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून भूदान जमिनींची ‘ए टू झेड’ चौकशी केली जाईल आणि एक-एक एकर जमिनीचा हिशोब घेतला जाईल. तसेच मोपा, गोवा व सिंधुदुर्ग सीमेलगत शेतकऱ्यांचे खोटे दाखले दाखवून परप्रांतीय लोक जमिनी खरेदी करत असल्याचे उघडकीस आले आहे. याचे सर्व व्यवहार सध्या थांबवण्यात आले असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकरी आत्महत्येवर ठोस उपाययोजना
शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, शेतकरी कर्जातच जगतो आणि कर्जातच जातो. आम्ही कर्जमाफी करत आहोतच, पण शेतकरी आत्महत्येकडे वळणारच नाही यासाठी शासन कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना आखत आहे. याशिवाय, ई-पीक पाहणी करताना काही सहायकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची शासन स्तरावर गंभीर दखल घेतली जाईलच, परंतु ज्या शेतकऱ्यांकडून पैसे उकळले गेले आहेत त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
