महानिर्मितीच्या वतीने आयोजित कार्यशाळेत वक्त्यांचे मत
दैनंदिन जीवनात स्पर्धेच्या व बदलत्या परिस्थितीत नियोजनपूर्ण बदल स्वीकारणे काळाची गरज बनली आहे. व्यवस्थापनातील बदलाची पद्धत, नियोजन आणि वेळेत अंमलबजावणी केल्यास स्वतला व कुटुंबाला आणि पर्यायाने आपण काम करीत असलेल्या संस्थेला त्याचा लाभ मिळू शकतो, असे मत महानिर्मितीच्या बदल व्यवस्थापनावर आयोजित कार्यशाळेत यशवंत मोहिते आणि अमोल मौर्य यांनी व्यक्त केले.
वीजनिर्मिती क्षेत्रामध्ये वेगाने बदल होत आहत. या परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती महानिर्मितीच्या प्रत्येक कर्मचारी, अधिकारीला ज्ञात असणे गरजेचे आहे.
या क्षेत्रातील मनुष्यबळाला, विविध आव्हानांचा सामना करता यावा या हेतूने महानिर्मिती व्यवस्थापनातर्फे सातत्याने प्रशिक्षणपर कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून ही कार्यशाळाही याच उपक्रमाचा एक भाग आहे.
कार्यशाळेतून मनुष्यबळाचे दैनंदिन जीवनमान उंचावणे, कामकाजात सुसूत्रता आणणे, गतीमानतेने प्रशासनिक कामे, कार्यपद्धतीत आवश्यक त्या सुधारणा करणे, ग्राहकांना उत्तोमोत्तम सेवा प्रदान करणे इत्यादी बाबींचा समावेश असतो, असे कार्यशाळेत मोहिते म्हणाले.
समारोपीय सत्रात सतीश चवरे म्हणाले, वीज क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत अशा पद्धतीचे प्रशिक्षण ही निश्चितच काळाची गरज आहे. महानिर्मितीच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी ‘स्मार्ट वर्क’ करण्याची गरज आहे. तसेच महानिर्मितीमध्ये नव्याने रूजू होणाऱ्या अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन राजेश पाटील यांनी केले.
कार्यशाळेला मनोज रानडे, राजेश पाटील, अनिल मुसळे, योगेंद्र पाटील, लता संखे उपस्थित होते. संचालन कौस्तुभ इंगवले यांनी तर आभार राजश्री भोसले यांनी केले.