नागपूर : यंदाचे साहित्य संमेलन वर्धेत होत आहे. वर्धा-सेवाग्राम-पवनार ही गांधी-विनोबांची कर्मभूमी असल्याने संमेलनासाठी गांधीविचारांवर लेखन करणाऱ्या लेखकाची अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, असा एक मतप्रवाह होता. त्यानुसार संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने ज्येष्ठ लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवारांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला. महामंडळाच्या इतर घटक संस्थांनीही द्वादशीवारांच्या नावाला समर्थन दिले. त्यामुळे द्वादशीवारांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच अध्यक्ष निवडीसाठीच्या बैठकीच्या काही तासांआधी मंत्रालयातून एक फोन आला आणि द्वादशीवारांचे नाव मागे पडून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे कळते.

साहित्य महामंडळाच्या बैठकीतील या नाटय़मय घडामोडीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्धेतील एका जबाबदार व्यक्तीला थेट मंत्रालयातून फोन आला आणि द्वादशीवारांच्या नावाबाबत काहीसा नाराजीचा सूर लावण्यात आला. द्वादशीवारांचे नाव निश्चत झाले तर संमेलनासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नका, असा सूचक इशारा देण्यात आला. या ‘जबाबदार’ व्यक्तीने तितक्याच जबाबदारीने हा संदेश अध्यक्ष निवडकर्त्यांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर बैठकीचा नूरच पालटला.

vaishali darekar s campaign, bjp mla ganpat gaikwad wife, bjp mla ganpat gaikwad wife to media,
मोदींसाठी भाजपचाच प्रचार करणार; आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची माहिती
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Demonstrations by Bhavna Gawli supporters
‘अखेरपर्यंत खिंड लढू’, भावना गवळी समर्थकांची निदर्शने
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

  द्वादशीवारांच्या नावासोबतच घटक संस्थांनी पाठवलेल्या इतर आठ नावांबाबत बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, अशी कुठलीही चर्चा न होता द्वादशीवारांना पर्याय म्हणून आधीच तयार ठेवण्यात आलेल्या चपळगावकरांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला आणि सर्वानी तो एकमताने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी महामंडळ आणि सर्व घटक संस्थांना स्वत: फोन करून द्वादशीवारांच्या नावाला पूर्व मंजुरी मिळवली होती. गोव्यात प्रस्तावित बैठकीत हे नाव अंतिमही होणार होते. परंतु, बैठकीच्या पूर्वसंध्येला म्हैसाळकरांचे निधन झाले व ही बैठकच रद्द झाली. आधी द्वादशीवारांच्या नावाला होकार देणाऱ्या काहींनी म्हैसाळकरांच्या निधनानंतर मात्र भूमिका बदलली व पर्यायी नावाचा शोध सुरू केला. त्यातून चपळगावकरांचे नाव समोर आले. परंतु, ते बिनविरोध निवडले जातील, अशी स्थिती कालपर्यंत नव्हती. प्रसंगी मतदानाचीही शक्यता वर्तवली जात होती. परंतु, मंत्रालयातून आलेल्या फोननंतर सगळे चित्रच बदलले आणि द्वादशीवारांच्या नावावर साधी चर्चाही झाली नाही. द्वादशीवारांनी काही दिवसांआधी नागपुरातील एका कार्यक्रमात ‘सावरकरप्रेमी लेखकांनी गांधींवर अन्याय केला’ असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य आणि मंत्रालयातून आलेल्या फोनचा संबंध जोडून वेगाने चर्चा सुरू आहे.

अवमान होऊ नये म्हणून..

यापूर्वी लेखक आणि कवींकडे संमेलनाचे अध्यक्षपद राहिले आहे. यावेळी मात्र व्यासंगी व विचारवंत लेखक म्हणून चपळगावकर अध्यक्षपदी लाभणार आहेत. गांधीवादी किंवा अन्य असा विचार चर्चेत आला नाही. इतरांचा अवमान होऊ नये म्हणून अध्यक्षपदासाठी आलेली इतर नावे जाहीर न करण्याचा निर्णय झाला, असे स्पष्टीकरण महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी दिले.

परिसंवादासाठी दहा विषय

वर्धा : अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक मंगळवारी वर्धेतील स्वाध्याय मंदिरात पार पडली. त्यानंतर महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी संमेलनाध्यक्षपदी चपळगावकर यांची निवड झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ३, ४ व ५ फेब्रुवारीला हे संमेलन वर्धेत होत आहे. संमेलनाचे उद्घाटन ३ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. परिसंवादासाठी दहा विषय ठरले आहेत. त्यात प्रामुख्याने, ‘महात्मा गांधी ते विनोबा- वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून’, कर्मयोगी गाडगेबाबा-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज-महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, ग्रंथालय चळवळीचे यशापयश, जागतिक साहित्यात मराठीचा झेंडा फडकवणारे अनुवादक, मराठी साहित्यातील उद्यम व अर्थविषयक लेखन आदी विषय आहेत, असे तांबे म्हणाल्या.

महामंडळाचे मौन

संमेलनाध्यक्षपदासाठी सुरेश द्वादशीवारांच्या नावाचा प्रस्ताव आधी अनेक घटक संस्थांकडून आला असताना त्यांच्या नावावर चर्चा का झाली नाही, त्यासाठी कुठला राजकीय दबाव होता का, याबाबत भाष्य करण्यास महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी नकार दिला. ज्यांची नावे शर्यतीत होती ती आता जाहीर करणे, हा त्यांचा अवमान ठरू शकतो. त्यामुळे ती जाहीर न करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे तांबे यांनी सांगितले.

मराठी साहित्य, भाषा आणि मराठी संस्कृती यांची अभिवृद्धी कशी होईल, याचा विचार करण्याचा हा काळ आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड हा विचार करण्यासाठी मला मिळालेली संधी आहे, असे मी मानतो.

– नरेंद्र चपळगावकर, नियोजित, अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन