प्रन्यासचे विश्वस्त असताना कागदपत्रांमध्ये फेरफार

भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष आणि दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे देवनगर गृह निर्माण सहकारी संस्थेतील एक भूखंड लाटल्याच्या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कोहळेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोहळे हे २००७ ते २०१२ या दरम्यान नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त होते. त्यावेळी त्यांनी देवनगर गृह निर्माण सहकारी संस्थेतील २२०० चौरस फुटाचा भूखंड क्रमांक २०१ (इ) खरेदी केला, परंतु प्रत्यक्ष ताबा घेताना याच भूखंडाच्या शेजारील दुसरा एक हजार चौ.फुटाचा भूखंड त्यांनी हडपला. त्यासाठी त्यांनी गृह निर्माण सहकारी संस्थेचा बोगस अध्यक्ष तयार केला. त्याला दुय्यम सहायक निबंधक कार्यालयात हजर केले आणि २२०० ऐवजी ३२०० चौ.फुटाचा भूखंड अशी नोंद करवून घेतली. २२०० चौ.फूट भूखंडाचे मालक अशोक जैन होते. या भूखंडाला लागून गृहनिर्माण सहकारी संस्थेचा १००० चौ.फुटाचा भूखंड आहे. कोहळे यांनी १३ मार्च २०११ ला खरेदीचा व्यवहार अशोक जैन यांच्याशी केला.

त्यानंतर पंढरी आत्माराम कडू यांना देवनगर गृह निर्माण सहकारी संस्थेचा बोगस अध्यक्ष बनवून दुय्यम नि. क्रमांक ६ या कार्यालयात हजर केले आणि भूखंड क्रमांक २०१ (इ) हा भूखंड २२०० ऐवजी ३२०० चौ.फूट नोंद करवून घेतली. हे करीत असताना मूळ भूखंड ३२०० चौ.फुटाचा आहे, परंतु चुकीने त्याची नोंद २२०० चौ.फूट झाली, असे सांगण्यात आले. त्या भूखंडाचे नवीन दुरुस्तीपत्र करवून घेतले, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हुडकेश्वर पोलिसांनी अशोक जीवनधर जैन रा. जैन मंदिराजवळ, गणेशनगर, पंढरी आत्माराम कडू रा. श्रीरामनगर, सचिन अशोक जैन रा. श्रीरामनगर आणि मनोज रवींद्र राऊत रा. श्रीरामनगर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्य़ात आता आमदार सुधाकर कोहळे यांना सहआरोपी करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर सुपारे यांनी माहितीच्या अधिकारात दिल्याचे अ‍ॅड. तरुण परमार, डॉ. अशोक लांजेवार आणि मोरेश्वर घाडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तिघांना जामीन, आमदारांना सूचनापत्र

या प्रकरणात अशोक जैन, पंढरी कडू आणि सचिन जैन यांनी उच्च न्यायालयातून जामीन प्राप्त केला असून मनोज राऊत व सुधाकर कोहळे यांना न्यायालयात हजर राहण्याचे सूचनापत्र देण्यात आले आहे, अशी माहितीही पोलिसांनी माहितीच्या अधिकारात दिली.

मुन्ना यादवनंतर आता शहराध्यक्ष अडचणीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. सध्या ते राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळाचे अध्यक्ष असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची कोंडी केली होती. त्यानंतर आता भाजपचे शहर अध्यक्ष कोहळे यांच्याविरुद्धच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने भाजप व सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बदनामीचा प्रयत्न

या जमीन व्यवहारात आपलीच फसवणूक झाली. त्यामुळे मूळ जमीन मालकाकडून पुन्हा जागेचे दुरुस्तीपत्र करण्यात आले. या प्रकरणाची पोलीस चौकशी करीत आहेत. आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून संबंधितांविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

सुधाकर कोहळे, आमदार