scorecardresearch

भारतात येत्या मेपर्यंत नामिबियातून चित्त्याचे आगमन; पाच वर्षांत ५० चित्ते आणण्याची योजना

भारतात चित्त्याच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून मे २०२२ पर्यंत तो येण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात मध्यप्रदेशातील कुनो येथे तीन ते पाच चित्ते येणार असून १५ ऑगस्टपर्यंत त्यांना जंगलात सोडले जाण्याची शक्यता आहे.

नागपूर : भारतात चित्त्याच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून मे २०२२ पर्यंत तो येण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात मध्यप्रदेशातील कुनो येथे तीन ते पाच चित्ते येणार असून १५ ऑगस्टपर्यंत त्यांना जंगलात सोडले जाण्याची शक्यता आहे.

भारतात चित्ता आणण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची चमू सुमारे महिनाभरापूर्वी नामिबिया येथे गेली होती. यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयातील अधिकारी तसेच राज्याचे प्रधान सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी भारतात पाठवल्या जाणाऱ्या चित्त्यांची पाहणी करून त्यांच्या स्थलांतरण व्यवस्थेचा आढावा घेतला. नामिबियाने सामंजस्य कराराचा मसुदा तयार केला. भारताने वन्यजीवांच्या शाश्वत उपयोगासाठी नामिबियाला पािठबा द्यावा, अशी एक अट या करारात असल्याचे कळते. या सामंजस्य कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी सध्या बोलणी सुरू आहे. मार्चअखेर या कराराला अंतिम स्वरूप मिळेल आणि त्यावर स्वाक्षरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नामिबिया सरकारद्वारे नाही तर चित्ता संवर्धन निधी या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने भारताला चित्ते देण्यात येणार आहेत. भारतात नोव्हेंबर महिन्यातच चित्ता येणार होता. त्यासाठी तयारी देखील झाली होती, पण करोनामुळे त्याचे आगमन लांबले.

नामिबियासोबत करण्यात आलेल्या करारावर सह्या झाल्या आहेत. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर आराखडा तयार होईल. भारतीय वन्यजीव संस्था अधिकाऱ्यांच्या मदतीने चित्ता भारतात कोणत्या मार्गाने आणायचा हे ठरवण्यात येईल. पुढील पाच वर्षांत ५० चित्ते भारतात आणण्याची योजना असून त्यावर सुमारे ४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान

मे महिन्यात चित्ता भारतात येणार आहे. परंतु, तापमानात सध्या प्रचंड वाढ होत आहे. चित्ता येथे आणला तरी किमान एक-दोन महिने त्याला येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी एकाच ठिकाणी ठेवण्यात येईल. जंगलात सोडताना रेडिओ कॉलर लावूनच सोडण्यात येईल, पण पावसाळय़ात कॉलिरगचा मागोवा घेणे थोडे कठीण जाते. त्यामुळे त्याच्या आगमनाचा काळ मागेपुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मध्यप्रदेशातील एका वनाधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cheetahs arrive india namibia mayplan bring leopards five years amy

ताज्या बातम्या