नागपूर: राज्य सरकारच्या विविध संस्थांकडून संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती ही उच्च शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाते. यात प्रामुख्याने संशोधकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (महाज्योती), छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (सारथी), आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था सारख्या संस्थांमार्फत दरमहा सुमारे ३१,००० ते ४२,००० अधिक आकस्मिकता निधी दिला जातो. या माध्यमातून संशोधक विद्यार्थी आता जागतिक दर्जाचे संशोधन करत असल्याचे समोर आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथील संशोधक ललित भोसले यांनी रसायनशास्त्राच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जैविक सामग्रीपासून (बायोमास) प्राप्त होणाऱ्या ‘हायड्रॉक्सी मिथिल फुरफुराल’ या संयुगाचा वापर करून औषधनिर्माण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ‘हायड्राझिनिल थायाझोल’ तयार करण्याची पर्यावरणपूरक पद्धत त्यांनी विकसित केली. यामुळे रासायनिक द्रव्यांशिवाय कमी वेळात उच्च प्रतीचे उत्पादन तयार करण्यास या पद्धतीने यश मिळाले आहे. या संशोधनाला युनायटेड किंगडमकडून (यूके) प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्वामित्व हक्क (पेटंट) मंजूर करण्यात आले आहे.
ललित भोसले हे शिवाजी विद्यापीठामधील पीएच.डी.चे विद्यार्थी आहेत. ‘बार्टी’कडून त्यांना या संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती देण्यात आली. भोसले यांच्या या संशोधनात ‘ग्राइंडस्टोन केमिस्ट्री’ या सोप्या आणि पर्यावरणस्नेही तंत्राचा अभिनव वापर करण्यात आला आहे. पारंपरिक रासायनिक प्रक्रियांमध्ये वापरण्यात येणारे घातक ‘सॉल्व्हेंट्स व कॅटालिस्ट’ टाळून रासायनिक द्रव्यांचा वापर न करता औषधांचे उत्पादन शक्य होणार आहे. यामुळे कमी वेळेत आणि उच्च प्रतीचे उत्पादन मिळवण्यात या संशोधनामुळे यश आले आहे.
या संशोधनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे जैविक सामुग्रीपासून मिळवलेल्या ‘फुरफुराल’चा वापर करून हायड्राझिनिल थायाझोल संयुगांची मोठी ‘लायब्ररी’ विकसित करण्यात आली आहे. ही संयुगे औषधनिर्माण क्षेत्रात प्रतिजैविक, अँटिऑक्सिडंट तसेच कर्करोग प्रतिबंधक उपचारांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या संशोधनासाठी बार्टीचे सहकार्य लाभल्याची भावना ललित भोसले यांनी व्यक्त केली. बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक तथा अधिछात्रवृत्ती विभागप्रमुख विशाल लोंढे यांनी या यशाबद्दल संशोधक विद्यार्थी ललित भोसले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

