नागपूर : देशभरात प्लॅटिनम-आधारित किमोथेरपी औषधांचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याने कर्करुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत आहे. ‘सिस्प्लॅटिन’, ‘कार्बोप्लॅटिन’, ‘ऑक्सालिप्लॅटिन’ या महत्त्वाच्या औषधांचा पुरवठा विस्कळीत झाल्याने डाॅक्टर्सना नियमित उपचार पद्धतींमध्ये बदल करावा लागत आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनाही या तुटवड्याचा फटका बसला आहे.
प्लॅटिनम-आधारित औषधांचे महत्व काय ?
कर्करोग उपचारांमध्ये प्लॅटिनम-आधारित औषधांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः डोके-मान, फुफ्फुस, अन्ननलिका, स्त्रीरोग, जठर आणि आतड्यांच्या कर्करुग्णांच्या उपचारांसाठी या औषधांचा वापर केला जातो. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून या औषधांचा पुरवठा कमी झाल्याने रुग्णालयांमध्ये अडचणीची स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी रुग्णांवर पर्यायी औषधांनी उपचार केले जात आहे. काही ठिकाणी तर उपचार पुढे ढकलण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे.
औषध तुटवड्याचे कारण काय ?
या तुटवड्यामागे ‘औषधासाठी लागणारे काही घटकांची टंचाई कारणीभूत आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाला असून वाहतूक आणि उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. प्लॅटिनम या महागड्या धातूंच्या किंमती वाढल्याने या औषधांच्या निर्मितीवरही थेट परिणाम झाला आहे. परिणामी काही कंपन्यांनी उत्पादन कमी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील आठवड्यापर्यंत काही प्रमाणात औषधे उपलब्ध होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. प्लॅटिनम-आधारित औषधांचा तुटवडा असला तरी इतर किमोथेरपी औषधे उपलब्ध असल्याचेही तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सर्व उपचार पूर्णपणे थांबले नसले तरी काही विशिष्ट रुग्णांच्या उपचारांवर त्याचा परिणाम होत आहे. देशभरातील अनेक कर्करोगतज्ज्ञांनी या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कर्करोग तज्ज्ञ काय म्हणतात…
सिस्प्लॅटिन’, ‘कार्बोप्लॅटिन’ आणि ‘ऑक्सालिप्लॅटिन’ या औषधांची कर्करुग्णांना मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. ही औषधे रुग्णांना माफक दरात उपलब्ध व्हावीत, यासाठी सरकारने जागतिक स्तरावरील अडचण दूर करायला हवी. दुसरीकडे देशातील औषध उत्पादक कंपन्यांनीही या औषधांचा पुरवठा वाढवावा, जेणेकरून तुटवडा दूर होऊन रुग्णांच्या उपचारांतील अडथळे कमी होतील. – डॉ. आनंद पाठक, वैद्यकीय संचालक, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर.
वैद्यकीय शिक्षण खात्याचे म्हणणे काय ?
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या ‘सिस्प्लॅटिन’, ‘कार्बोप्लॅटिन’ आणि ‘ऑक्सालिप्लॅटिन’ या प्लॅटिनम-आधारित किमोथेरपी औषधांच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. संबंधित औषधे लवकर उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र इतर सर्व किमोथेरपी औषधे उपलब्ध असून त्यावर उपचार होत आहे. – धीरज कुमार, सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मुंबई.
