गडचिरोली : छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमाभागात बुधवारी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले तर जिल्हा राखीव दलाचे तीन जवान शहीद झाले. यामुळे एकट्या छत्तीसगडमध्ये या वर्षात विविध चकमकींमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या २७५वर गेली आहे. त्यापैकी २४६ नक्षलवादी बस्तर विभागात ठार झाले.

बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी घातपात घडवण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची गोपनीय माहिती यंत्रणेला मिळाली होती. त्यावरून डीआरजी, एसटीएफ (विशेष कार्य दल) आणि कोब्रा सुरक्षा दलाचे विशिष्ट कमांडो यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून परिसरात शोध मोहीम सुरू केली.

या मोहिमेदरम्यान, दबा धरून असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. यात तीन जवान शहीद झाले. चकमकीनंतर जवानांनी परिसरात शोध घेतला असता आतापर्यंत १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. मात्र, अद्याप त्यांची ओळख पटवता आलेली नाही. घटनास्थळावरून ‘एसएलआर’ आणि ३०३ बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवले

शहीद झालेल्या तीन जवानांमध्ये मुख्य हवालदार मोनू वडाडी, हवालदार दुकारू गोंडे आणि जवान रमेश सोधी यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त जवान सोमदेव यादव यांच्यासह दोघे जखमी झाले असून, त्यांना प्रथमोपचारानंतर पुढील उपचारांसाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सोमदेव यादव यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

हिंसक घटनांमध्ये घट

देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणांमुळे हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. २०१४ ते २०२४ या दशकात हिंसक घटनांची संख्या घटून ७,७४४ पर्यंत खाली आली आहे, जी मागील दशकापेक्षा सुमारे ५३ टक्के कमी आहे. तसेच, २०१० मधील सर्वाधिक हिंसक घटनांची संख्या (१,९३६) घटून २०२४ मध्ये केवळ ३७४ पर्यंत आली आहे, जी ८१ टक्के इतकी आहे. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेले जिल्हे देखील १२६ वरून घटून २०१५ पर्यंत ११ पर्यंत आले आहेत. सध्याच्या घडीला नक्षल संघटनेतील पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचे केवळ सहा सदस्य शिल्लक आहे. सक्रिय सदस्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. छत्तीसगडमधील सुकमा, बिजापूर आणि नारायणपूर हे केवळ तीन जिल्हे अति नक्षल प्रभावित आहे. १५ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा देखील यातून वगळण्यात आला आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र झारखंड, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या सीमाभागात अजूनही काही प्रमाणात नक्षलवाद्यांच्या हालचाली आहेत.