वर्धा : राज्याची ओळख देतांना त्या राज्यातील निसर्गाची सांगड घातल्या जाते. म्हणजे राज्य प्राणी, पक्षी, फुल आणि फुलपाखरू पण…. राज्याचे फुलपाखरू जाहीर करण्याची प्रथा देशात प्रथम महाराष्ट्राने सूरू केली. २०१५ साली महाराष्ट्राने ब्लु मॉरमन यास राज्य फुलपाखरू म्हणुन लोकांच्या पसंतीवर जाहीर केले होते. आता छत्तीसगड राज्य फुलपाखरू जाहीर करीत देशात ९ वे राज्य ठरले. एक केंद्रशासित प्रदेश पण आहे.
छत्तीसगड राज्याचे फुलपाखरू
जैवविविधतेचा अनमोल ठेवा जपणाऱ्या छत्तीसगड राज्याने आपल्या पहिल्या ‘राज्य फुलपाखरू’ची (State Butterfly) अधिकृत निवड केली आहे. अत्यंत दुर्मिळ आणि नैसर्गिक कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘ऑरेंज ओकलीफ’ (Orange ओकलेफ ) या देखण्या फुलपाखरावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आता केवळ राज्य शासनाच्या अंतिम राजपत्राची (Gazette) औपचारिक घोषणा बाकी आहे.
लोकशाही मार्गाने ५१.६% मताधिक्य
छत्तीसगडच्या वन विभागाने ३१ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘गूगल फॉर्म’च्या माध्यमातून एक विशेष ऑनलाइन पोल आयोजित केला होता.
असे झाले मतदान
राज्यातील नागरिकांचा आणि निसर्गप्रेमींचा कौल जाणून घेण्यासाठी तीन प्रमुख फुलपाखरांची नामांकने शर्यतीत ठेवण्यात आली होती.
या स्पर्धेत नोंदवल्या गेलेल्या एकूण ५,८१३ मतांपैकी एकट्या ऑरेंज ओकलीफला तब्बल ३,००० मते (५१.६%) मिळाली. प्रतिस्पर्धी ठरलेल्या ‘कॉमन बँडेड पीकॉक’ला १,६०६ मते तर ‘स्पॉट स्वॉर्डटेल’ला १,२०७ मते प्राप्त झाली. जनमताचा हा कौल आणि प्रजातीचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन वन्यजीव मंडळाने ऑरेंज ओकलीफची निवड केली.
ऑरेंज ओकलीफ म्हणजे पानफुलपाखरू
‘ऑरेंज ओकलीफ’ (Orange Oakleaf) या फुलपाखराला मराठीत ‘सुके पान’ किंवा ‘पानफुलपाखरू’ असे म्हटले जाते. इंग्रजीत याला ‘ड्रेड लीफ बटरफ्लाय’ (Dead Leaf Butterfly) किंवा ‘इंडियन लिफ बटरफ्लाय’ असेही म्हणतात. ऑरेंज ओकलीफ या फुलपाखराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बचावाची अनोखी पद्धत. जेव्हा हे फुलपाखरू आपले पंख मिटते, तेव्हा ते एखाद्या सुकलेल्या पानासारखे दिसते. झाडाच्या फांदीवर किंवा जमिनीवर बसलेले असताना शिकारी प्राण्यांना अथवा पक्ष्यांना ते सहजासहजी ओळखता येत नाही. मात्र, जसे हे फुलपाखरू पंख उघडते, तसा त्याचा आतला भाग अत्यंत चमकदार नारंगी, गडद निळा आणि काळ्या रंगांच्या नयनरम्य उधळणीने उजळून निघतो.
जैवविविधता संवर्धनाला गती
२०२५ मधील राज्याच्या जैवविविधता अहवालानुसार छत्तीसगडमध्ये तब्बल २०१ फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. भारतात एकूण १,५०० प्रजातींची नोंद आहे. फुलपाखरे ही केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून, परागीभवन आणि पर्यावरणाच्या आरोग्याचे प्रमुख सूचक मानली जातात. या निर्णयामुळे छत्तीसगडमधील जंगल आणि नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनाला मोठा हातभार लाभेल. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचेही राज्य फुलपाखरू ऑरेंज ओकलीफ हेच आहे.
