अकोला : पश्चिम विदर्भ हा शेतकरी आत्महत्याच्या दृष्टचक्रात अडकलेला भाग. त्यातही वाशीमवर आकांक्षित जिल्ह्याचा ठपका. परंपरागत पीक पद्धतीमुळे तोट्यात असलेली शेती. उत्पादित पिकांना भाव नाही. शेतकरी कर्जबाजारीच्या गर्तेत अडकलेला, हे सार्वत्रिक चित्र. या परिस्थितीत ‘सुपरफूड’ चिया लागवडीचा नवा अध्याय वाशीम जिल्ह्यात प्रारंभ झाला. रब्बी हंगामातील पीक पद्धतीमध्ये परिवर्तन घडून आले. लागवडीच्या विशेष अभियानातून चिया उत्पादक शेतकरी समृद्धीच्या वाटेवर आले आहेत.
चिया पिकाचे मूळ कुठे?
चिया हे पीक मूळचे मेक्सिको आणि ग्वाटेमाला या मध्य अमेरिकन देशांमधील आहे. प्राचीन काळातील ॲझटेक आणि माया संस्कृतीमध्ये या पिकांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. भारतामध्ये हे पीक सर्वप्रथम म्हैसूर येथील ‘सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट’ येथे आणल्या गेले. भारतात या पिकाची लागवड प्रामुख्याने २०१४-१५ च्या सुमारास म्हैसूरमध्ये झालेल्या संशोधनानंतर सुरू झाली. सुरुवातीला म्हैसूर, बंगळुरू भागात पिकाचे यशस्वी प्रयोग केल्यानंतर तामिळनाळू व राजस्थानमध्ये पीक पसरले. भारतात आता हे पीक कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. राज्यामध्ये विशेषत: विदर्भ व मराठवाड्यात चियाचा पिकाची यशस्वी सुरुवात झाली. वाशीम जिल्ह्यात गेल्या काही रब्बी हंगामामध्ये चिया पिकाच्या लागवडीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर टाकली आहे.
आरोग्यासाठी चिया अत्यंत लाभदायक; वजन कमी होण्यास मदत
चियाला ‘सुपरफूड’ म्हणून विशिष्ट ओळख आहे. याच्या बिया पोषणतत्वांनी समृद्ध आहेत. प्रथिने आणि तंतूमय पदार्थ शरीराला उर्जा देत असून पचन सुधारते. ओमेगा- ३ फॅटी ॲसिड्स, हृदयविकार टाळण्यात मदत करते. हृदयाचे आरोग्य सुधारुन खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरते. फायबर आणि प्रथिनांचे योग्य मिश्रण असल्यामुळे चिया बिया साखर नियंत्रणात ठेवतात. मधुमेह रुग्णांसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते. ‘अँटीऑक्सिडंट्स’ त्वचेचा तजेला टिकवून ठेवते. चियाच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर आढळून येते. पाण्यात भिजत ठेवल्यावर त्या विरळून जेल स्वरूपात पदार्थ तयार होतो. त्याचे प्राशन केल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे अतिरिक्त भूक न लागता वजन नियंत्रणात व कमी करण्यास मदत होते. हाडांच्या मजबुतीसाठी चिया आवश्यक ठरते. आरोग्यासाठी अमृतासमान ठरणाऱ्या चियाची मागणी सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
शेतकऱ्यांचे आधुनिक पिकांकडे पाऊल
वाशीम जिल्ह्यात शेतकरी पारंपरिक पिकांपासून वेगळ्या आधुनिक पिकांकडे वळत आहेत. यामध्ये चिया पिकाने अल्पावधीतच शेतकऱ्यांना आकर्षित केले. आरोग्यासाठी फायदेशीर आणि चांगला दर मिळाल्यामुळे रब्बी हंगामामध्ये चियाची लागवडीत झपाट्याने वाढ झाली. वाशीम जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवली. वाशीम जिल्हा चिया उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे आणि सेंद्रिय शेतीला चालना देऊन पर्यावरणपूरक शेतीस प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले. प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. चिया लागवडीसाठी प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये चिया पीक लागवडीसाठी एक रुपया खर्च केला, तर शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादनातून ४.८१ पैसे मिळू शकतील, या दृष्टीने नियोजन केले. पहिल्या वर्षी ८५० हेक्टरवर लागवड झाली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या पिकाला वन्यप्राण्यांचा त्रास होत नाही. गहू पिकापेक्षा याला कमी पाणी लागते. दोन हंगामामध्ये सुमारे २२ टक्क्याने चियाची लागवड वाढली, असे आरिफ शाह यांनी सांगितले. चियाच्या लागवडीमुळे वाशीम जिल्ह्यातील शेती क्षेत्राला नवा आयाम मिळाला. हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत ठरले. जिल्ह्याचे आर्थिक चित्र सकारात्मकपणे बदलण्यास मदत होत आहे.
उत्पादनापासून विक्रीपर्यंतची साखळी
१० ते ३५ अं.से. तापमान आणि चांगल्या निचऱ्याची हलकी आणि मध्यम जमीन चिया पिकासाठी उत्तम आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाला आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत उत्तम भाव मिळताे. वाशीम जिल्ह्यात चिया पिकाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत साखळी निर्माण करण्यात आली. चांगला भाव मिळण्यासाठी त्याचा दर्जा राखणे महत्त्वाचे असते. स्वच्छता आणि प्रतवारीसाठी आत्मामधून अनुदान दिले. प्रक्रिया उद्योग उभारले. खरेदीदार व विक्रेत्यांचे संमेलन भरून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. रासायनिकऐवजी सेंद्रिय उत्पादनाला चांगला भाव मिळाला. चियाची लागवड प्रोत्साहनासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत पुण्यातील एका नामांकित कंपनीने १४ हजार रुपये प्रति क्विंटल दराने सेंद्रिय पद्धतीने उत्पादित चिया खरेदी करण्याचा करार केला होता. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या बाजारपेठेची हमी मिळाली. ‘‘सेंद्रिय पद्धतीने उत्पादित चियाला चांगला बाजारभाव मिळतो. यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. चियाची लागवड करताना आम्हाला कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळाले. बाजारपेठ उपलब्ध असल्याने आर्थिक अडचणी कमी झाल्या आहेत,’’ असे रिसोड येथील चिया उत्पादक शेतकरी संतोष पाटील यांनी सांगितले. चिया लागवडीच्या विशेष उपक्रमामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाले आहेत.
