रेडिसन ब्ल्यू ते जयताळा रस्ता खड्डय़ाने व्यापला

उपराजधानीची नवी ओळख ‘मेट्रो सिटी’ अशी होत असली तरी रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे ‘खड्डय़ांची उपराजधानी’ अशी आणखी एक बिरुदावली या शहरामागे लावावी की काय अशी स्थिती सध्याची आहे. हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा हा संपूर्ण मार्ग खड्डय़ांनी व्यापला असून या मार्गाने प्रवास करणे म्हणजे कंबरडे मोडून घेणे, अशी अवस्था आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे. पण रस्त्यांची अवस्था सुधारलेली नाही.

हॉटेल रेडिसन ब्ल्यूपासूनच खड्डय़ांची मालिका सुरू होते. खड्डय़ांमधून रस्ता शोधत जाणाऱ्या नागरिकांची शनिवारी जरा अधिकच फरफट होते. राजीवनगर चौकात भरणारा शनिवार बाजार, त्यातून मालाचे उभे असणारे ट्रक आणि भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने अशा गर्दीतून वाट शोधताना खड्डय़ांमुळे अक्षरश: कंबरडे मोडले जाते. याच मार्गावर खामला परिसरात दररोज आणखी भाजी बाजार भरतो. यातून प्रतापनगरकडे वळताना अगदी वळणमार्गावर भलामोठा खड्डा आहे.

गेल्या वर्षी या खड्डय़ाने रात्रीच्यावेळी भर पावसात अनेक दुचाकीस्वारांचे कंबरडे मोडले. नंतर हा खड्डा बुजवण्यात आला, पण आता तो पुन्हा ‘जैसे-थे’ झाला. या दोन भाजीबाजारादरम्यानच्या रस्त्यांवर खड्डय़ांची मालिका तयार झाली आहे. जयप्रकाश नगरातील आप्तस्वकीयांकडे मुख्यमंत्री कित्येकदा याच रस्त्याने येतात, तरीही रस्त्यांचा दर्जा सुधारला नाही. याच मार्गावर सहकारनगर घाट आहे, अनंताच्या प्रवासाला निघालेल्या ‘त्या’ जीवालासुद्धा यातना सहन करतच जावे लागते. मुख्य म्हणजे थोडासा पाऊस झाला तरी याठिकाणी वाहनाचे चाक बुडेल एवढे पाणी साचते आणि अशावेळी खड्डे दिसून येत नाहीत.  हिंगणा एमआयडीसीत नोकरीवर, तसेच हिंगणा परिसरात अनेक महाविद्यालये असून या महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते, पण कायम त्यांना खड्डय़ातून वाट काढत जावे लागते. त्यामुळे येथे दर एक-दोन दिवसाआड कुणी ना कुणी पडतोच.

जयताळा मार्ग ते त्रिमूर्तीनगर

जयताळा मार्ग ते त्रिमूर्तीनगर रस्त्यादरम्यान आणखी एक खड्डय़ांची मालिका दिसून येते. गेल्या वर्षी या परिसरातील नागरिकांनी खड्डे रंगवण्याचे अनोखे आंदोलन केले. अधिकारी, कंत्राटदार, राजकीय नेत्यांचे याकडे लक्ष वेधण्याचा नागरिकांचा प्रयत्न होता. निषेधाच्या या अभिनव पद्धतीनंतरही ढिम्म प्रशासनावर त्याचा काहीएक फरक पडला नाही. राष्ट्र निर्माण संघटनेने खड्डय़ांची ही मालिका महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली, पण त्याचाही परिणाम झाला नाही. हिंगणा टी पॉईंट ते अंबाझरी मार्गावर तीन ठिकाणी मोठे खड्डे आहेत. याठिकाणी मेट्रोचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे गर्दीच्या या परिसरात गल्लीबोळासारख्य्या झालेल्या रस्त्यांवरील वाट चुकवत वाहन चालवताना फार मोठे दिव्य पार पाडावे लागते.

महापालिका ढिम्म

पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डय़ातून वाट काढणे कठीण होते. हा दरवर्षीचाच विषय असला तरी यावेळी सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे हा प्रश्न आणखी अवघड करून ठेवला आहे. अर्धवट बांधकाम आणि त्यातच त्रिमूर्तीनगरातील या खड्डय़ांमुळे कित्येक वाहनचालकांना आम्ही येथे पडताना पाहिले आहे. गेल्या वर्षी खड्डे रंगवण्याचा अभिनव उपक्रम आखला, जेणेकरून महापालिका प्रशासनाला जाग येईल, पण प्रशासन अजूनही जागे झालेले नाही. त्यामुळे मुलांना खाली एकटे सोडण्याची हिंमत होत नाही, अशी प्रतिक्रिया त्रिमूर्तीनगरातील तलमले इस्टेटमध्ये राहणाऱ्या प्राजक्ता वानखेडे यांनी व्यक्त केली.