नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) २०२५ च्या जाहिरातीमध्ये एकूण ६७४ पदे जाहीर झाली असून त्यात पोलीस उपनिरीक्षकांसाठी (पीएसआय) ३९२ पदांचा समावेश आहे. या परीक्षेदरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एकवेळची विशेष संधी देण्याची मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे. या संदर्भात लोकसत्ताने ऑनलाईनला वृत्त प्रकाशित केल्यानंतर आता राजकीय वर्तुळातूनही वयवाढी संदर्भात निर्णय घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मात्र, परीक्षा तोंडावर आल्यानंतरही सरकारकडून कुठलाही निर्णय न झाल्याने अखेर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्यांद्री अतिथीगृहामध्ये भेट घेतली. तसेच यावेळी हा विषय समजावून सांगितला. यावर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांनी मोठे आश्वासन दिले.
सामान्यतः ही जाहिरात डिसेंबर-जानेवारीत येते आणि परीक्षा मार्च-मे मध्ये होते. यावर्षी मात्र जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी निघून परीक्षा २१ डिसेंबर २०२५ ला होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वयोमर्यादा मोजण्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही तारीख निश्चित केली आहे. यामुळे गेल्या ३-४ वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय १-२ महिन्यांनी अधिक झाले असून ते आपोआप अपात्र ठरत आहेत. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. पोलीस भरतीमध्ये २०२२-२०२५ दरम्यान वय ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य शासनाने एकवेळची विशेष संधी दिली होती. त्या धर्तीवर आता एमपीएससी संयुक्त गट-ब (विशेषतः पीएसआय) साठीही अशा विद्यार्थ्यांना एकवेळची वयोमर्यादा सवलत देण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा, यात हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अडले आहे, असे विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वय मर्यादा खुल्या प्रवर्गास ३१ वर्षे आणि राखीव प्रवर्गास ३४ वर्षे आहे. संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ जाहिरात २९ जुलैला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वयोमर्यादा गणना दिनांक १ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. ही जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी ७ महिने उशीर झाला आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. मागील वर्षी संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ जाहिरात उशीरा आल्याने राज्य शासनाने शासन निर्णय जारी करून १ वर्ष वय सवलत दिली होती. तसेच सरकारने २०२५ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठी देखील वय सवलत दिली आहे. त्याअनुषंगाने संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ वर्ष वयसवलत मिळावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासित केले की संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. या भेटीसाठी आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार्य केले. शिष्टमंडळात अनिकेत देशमाने, गणेश गोंडाळ, प्रवीण पाटील, प्रदीप लोंढे, विवेक जाधव, माधुरी मोहिते आणि प्रियांका पवार उपस्थित होते.
