नागपूर: राज्यात आज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीगनरसह २९ महानगरपालिका निवडुकांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. परंतु या निवडणुकीत अनेक गोंधळ समोर येत आहे. मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, धुळेसह अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मनसे अध्यत्र राज ठाकरे यांनी देखील या प्रकारावर गंभीर आक्षेप नोंदवला आहे.

बोटावर मार्करने शाही लावली जात असल्याने आणि नंतर ती पुसली जात असल्याने राज ठाकरेंनी त्यावर आक्षेप घेतला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांचा जर मार्करच्या शाहीवर विश्वास नसेल तर आयोगाने ऑईल पेंट आणून लावावा. आम्हाला काहीही हरकत नाही. मात्र, उद्याचा महापालिकेतील पराभवर डोळ्यासमाेर दिसत असल्याने राज ठाकरे आतापासून कशाला दोष द्यायचा याची तयारी करत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ करिता कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ भागातील व्हीआयपी रोडवरील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केले. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन केले.

हे लोकशाहीसाठी योग्य नाही

महाराष्ट्रातील जनता ही विकासासोबत आहे. ती विकासालाच मतदान करणार आहे. विरोधकांना आपला पराभव दिसत असल्याने ते आता वेगवेगळी कारणे शोधत आहेत. त्यांनी आजपासूनच उद्या कशाला दोष द्यायचा याची तयारी सुरू केली आहे. अनेकदा न्यायालयाने फटकारल्यानंतरही विरोधक कामय प्रशासकीय यंत्रणांना दोष देतात. हे लोकशाहीसाठी योग्य नाही. राज ठाकरेंनी मार्करने लावण्यात आलेली शाही पुसली जात असल्याचा आरोप केला. यावर खुद्द फडणवीसांनी हाताची शाही पुसून दाखवली. जर आता कुणला आक्षेप असेल तर त्यांनी आयोगाला सांगावे. आयोग त्यावर कारवाई करेल. याउलट आयोगाने ऑइल पेंट हाताला लावाला आमचा काहीही आक्षेप नाही. परंतु, केवळ पराभवाच्या भीतीने व्यवस्थेला दोष देणे योग्य नाही असेही फडणवीस म्हणाले.