मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे उपमुख्यमंत्र्यांकडून सारथ्य; समृद्धी महामार्गाची शिर्डीपर्यंत पाहणी | Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis inspect Samriddhi Highway amy 95 | Loksatta

मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे उपमुख्यमंत्र्यांकडून सारथ्य; समृद्धी महामार्गाची शिर्डीपर्यंत पाहणी

नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पाहणी केली.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे उपमुख्यमंत्र्यांकडून सारथ्य; समृद्धी महामार्गाची शिर्डीपर्यंत पाहणी
समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पाहणी केली

नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पाहणी केली. या वेळी शिंदे व फडणवीस यांनी एकाच वाहनातून शिर्डीपर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. या वेळी फडणवीस यांनी शिंदे यांच्या वाहनाचेही सारथ्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी या महामार्गाची रस्तेमार्गाने पाहणी करण्याचे शिंदे-फडणवीस यांनी जाहीर केले होते. फडणवीस शनिवारीच नागपुरात दाखल झाले होते. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी बरोबर १२.४५ वाजता त्यांनी समृद्धी महामार्गावरील प्रारंभ स्थानाहून (झिरो पॉइंट) शिर्डीकडे प्रवासाला सुरुवात केली. शिंदे आणि फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करीत होते. या वेळी फडणवीस हे स्वत: वाहन चालवत होते, तर मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते.

मुख्यमंत्र्यांच्या समवेत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते. शिवरायांचा जन्म शिवनेरीवरचमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांची कोणासोबतही तुलना होऊच शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवरच झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते.

विकासासाठी मार्ग निर्णायक- शिंदे
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हा प्रकल्प आहे. त्या वेळी ‘एमएसआरडीसी’ माझ्याकडे होते. आता मुख्यमंत्री झाल्यावर या रस्त्याचे काम पूर्ण होत असल्याने स्वप्नपूर्तीचा आनंद आहे. हा प्रकल्प विकासासाठी निर्णायक ठरेल. उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत असल्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा – फडणवीस
समृद्धी महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाडा या दोन मागास भागांसाठी महत्त्वाचा आहे. याचा फायदा या दोन्ही भागांच्या विकासासाठी होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 03:31 IST
Next Story
नागपूर: वन अकादमीकडून परवानगीशिवाय ‘टॉकिंग ट्री’ ॲपचा वापर; वनमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय