scorecardresearch

‘त्या’ महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे; उपवनसंरक्षकांविरोधात विनयभंगाची तक्रार

सांगलीचे उपवनसंरक्षक विजय माने यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न्यायासाठी साकडे घातले आहे.

hammer
प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : सांगलीचे उपवनसंरक्षक विजय माने यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न्यायासाठी साकडे घातले आहे. वर्षभरापूर्वी मेळघाट वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. आता दुसऱ्या आत्महत्येची वाट आपण पाहात आहात का, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

सांगलीचे उपवनसंरक्षक विजय माने यांच्याविरोधात सांगली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात बारा दिवसांपूर्वी विनयभंगाची तक्रार दिली. यानंतर वनविभागाने माने यांचा कार्यभार काढून घेत. मात्र, मुख्यालय कायम आहे. त्यामुळे माने हे कार्यालय परिसरात राहून तक्रारकर्त्यां अधिकारी महिलेवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी कडेगाव येथील निवासस्थानी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीने त्यांना माने यांच्याविरोधातील तक्रार मागे घ्या, अन्यथा तुमची नोकरी जाईल, अशी धमकी दिली. त्या अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला करण्याचा इशारही दिला. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याने पुन्हा एक तक्रार दाखल केली. मात्र, वनखात्याकडून त्यांना हवे तसे सहकार्य मिळत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

मेळघाट वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर वनखात्याची यंत्रणा थोडीफार सक्रिय झाली होती. याप्रकरणी तत्कालीन उपवनसंरक्षकांना निलंबित करण्यात आले. हीच वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून पोलिसात तक्रार करून न्याय मागण्याचा पर्याय मी निवडला. संबंधित अधिकाऱ्याकडून माझ्या व कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. वनखाते माझ्या संयमाची परीक्षा घेत आहे. शेवटची अपेक्षा म्हणून आपल्याला पत्र लिहित आहे. यानंतरही न्याय मिळाला नाही तर महिला अधिकारी वनखात्यात काम करण्यास धजावणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. वनखात्याची धुरा सांभाळणारे आणि खात्याप्रती संवेदनशील म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला न्याय मिळवून देणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

तक्रार मागे घेण्यासाठी दबाव

या प्रकरणात विजय माने यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. त्यावर बुधवारी पुन्हा सुनावणी झाली असता ३० मे पर्यंत अंतरिम जामीन वाढवण्यात आला. दरम्यान, माने यांच्याकडून सांगली महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर तक्रार मागे घेण्यासाठी विविध मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आंदोलनाचा इशारा

याप्रकरणी संबंधित उपवनसंरक्षकाला तातडीने निलंबित करणे अपेक्षित होते. उपवनसंरक्षक माने यांच्याकडून तक्रारकर्त्यां महिला अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे माने यांचे मुख्यालय नागपूर करण्यात यावे आणि महिला अधिकाऱ्याला न्याय द्यावा, अन्यथा कामबंद आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister justice woman forest ranger complaint molestation forest rangers ysh

ताज्या बातम्या