शासन निर्णय त्वरित निर्गमित करण्याची मागणी

नागपूर : मराठी विद्यापीठ स्थापनेबाबत अशासकीय तज्ज्ञांची दीर्घ प्रतिक्षित समिती नियुक्त करण्याचा शासन निर्णय आठ दिवसात काढू, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नागपुरातील पत्रपरिषदेत जाहीर केले होते.

यास बराच अवधी झाल्याने शासन निर्णय त्वरित निर्गमित व्हावा, अशी मागणी ‘मराठीच्या व्यापक हितासाठी’चे प्रमुख संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून स्मरण करून दिले.

राज्यात मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याच्या मागणीनंतर अशासकीय तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याबाबत मराठीच्या व्यापक हितासाठी काम करणारे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी शासनासोबत अनेकदा पत्रव्यवहार केला.

उदय सामंत यांनी नागपुरात मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी येत्या आठ दिवसात अशासकीय तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे स्वागत झाले. सामंत यांचे अभिनंदन करण्यात आले.  याबाबत तात्काळ निर्णय घेत आदेश काढावे, अशी मागणी करणारा ईमेल मुख्यमंत्री ठाकरे व उदय सामंत यांना पाठवला होता.

मात्र घोषणा करून दिलेला कालावधी लोटला तरी अजूनही त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे डॉ. जोशी यांनी पुन्हा मुख्यमंत्री व उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांना घोषणांची आठवण करून देत स्मरणपत्र पाठवले आहे.

समिती स्थापनेचा शासन निर्णय जाहीर केल्याप्रमाणे आठ दिवसात निर्गमित केला जाईलच, अशी अपेक्षा डॉ. जोशी यांनी स्मरणपत्रात केली आहे.