नागपूर : जन्मानंतर अवघ्या तीन दिवसांत गंभीर हृदयविकाराचे निदान, ऑक्सिजनवर असलेली नवजात बालिका, लाखोंच्या उपचारांचा खर्च आणि हातावर पोट असलेले गरीब कुटुंब… अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हा कक्षाने तत्परतेने मदतीचा हात दिल्याने एका चिमुकलीला नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

नेमके प्रकरण काय?

अचलपूर येथील मूळ रहिवासी असलेले एक कुटुंब रोजगारासाठी अमरावतीत वास्तव्यास आहे. कुटुंबातील कर्ते पुरुष भाड्याने ऑटोरिक्षा चालवून संसार चालवतात. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. मात्र जन्मानंतर लगेचच बाळाची प्रकृती बिघडू लागल्याने डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले.

कुटुंबासमोर कोणते संकट उभे राहिले?

नवजात बालिकेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्या वेळी बालिका ऑक्सिजन सपोर्टवर होती. मात्र ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेचा खर्च परवडत नसल्याने पालक पूर्णपणे हतबल झाले होते. त्यातच शस्त्रक्रिया तीन महिन्यांनंतरच होऊ शकणार असल्याचे सांगण्यात आल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट निर्माण झाले.

मदतीसाठी पुढे कोण आले?

या परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, अमरावतीचे डॉ. श्याम गावंडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी, विदर्भ व नागपूर विभागाचे सदस्य सचिव तथा प्रभारी अधिकारी डॉ. सागर पांडे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. पांडे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.

बालिकेसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली?

नागपूरमधील खासगी रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधत नवजात बालिकेला रात्रभर उपचारासाठी दाखल ठेवण्यात आले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेद्वारे सुरक्षितपणे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे रुग्णवाहिका, दाखल प्रक्रिया आणि उपचारांचा संपूर्ण खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आला. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक भार पडला नाही.

पुढील उपचार कसे होणार?

डॉ. सागर पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांनंतर आवश्यक असणारी शस्त्रक्रियाही मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत करण्यात येणार आहे. त्यामुळे कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.’मुख्यमंत्री महोदयांची प्रेरणा डोळ्यांसमोर ठेवून गरजू रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेळेत मदत मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात,’ अशी भावना डॉ. सागर पांडे यांनी व्यक्त केली.

नागरिकांसाठी काय आवाहन?

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी गरजू नागरिकांनी मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.