अकोला : वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याने अतिक्रमण काढण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारतांना वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले. दीपक नारायण इंगोले (४२, मुख्याधिकारी, नगर परिषद, मंगरुळपीर) व असलम जमिल सिद्दिकी (५५, खासगी व्यक्ती) असे आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने वाशीम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, एसीबीच्या पथकाने मुख्याधिकाऱ्याच्या घराची झाडाझडती घेऊन पाच लाख २२ हजारांची रोकड जप्त केली आहे. तक्रारदाराने वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार, मंगरुळपीर शहरात तक्रारदार यांचा प्लॉट असून त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले. प्लॉटवरील अतिक्रमण काढून देण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला. त्यावर मुख्याधिकाऱ्याने अतिक्रमण काढून देण्याच्या बदल्यात एक लाखाची लाच मागितली. २३ व २४ मार्चला केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून मंगळवारी सायंकाळी मंगरुळपीर येथे सापळा रचण्यात आला. खासगी व्यक्तीने मुख्याधिकाऱ्यासाठी एक लाख रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. या प्रकरणी एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध मंगरुळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वाशीम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, सापळा व तपास अधिकारी ममता अफूने, पोलीस निरीक्षक महेश भोसले यांच्यासह पथकाने केली. मुख्याधिकाऱ्याच्या वाशीम येथील निवासस्थानाची एसीबीच्या पथकाने झाडाझडती घेतली. यावेळी घरातून पाच लाख २२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief officer of mangrulpir municipal council arrested for taking bribe zws
First published on: 25-05-2022 at 19:40 IST