अमरावती: पावसाळा सुरू होताच सातपुडा पर्वतरांगा निसर्गाच्या हिरव्यागार शालूने नटून जातात. याच पर्वतरांगांमध्ये चिखलदरा हे पर्यटनस्थळ पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. धुक्याची दुलई, खळखळणारे धबधबे आणि नयनरम्य घाटांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले या ठिकाणी वळतात. पर्यटकांची मोठी गर्दी होते. शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक मौजमजा करण्यासाठी जात असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ती टाळण्यासाठी आता प्रशासनाने एकमार्गी वाहतुकीचा पर्याय निवडला आहे.
चिखलदरा ये-जा करण्यासाठी मार्ग कोणते?
चिखलदरा येथे सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार व रविवारला भरपूर प्रमाणात पर्यटक येत असतात. परतवाडा ते चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाट वळणाचा असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे येत्या २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत महत्त्वाचे सण, उत्सव, शासकीय सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार / रविवार या दिवशी परतवाड्यावरुन चिखलदराकडे जाणारी वाहतुक ही परतवाडा वरुन धामणगांव गढी मार्गे चिखलदरा तसेच चिखलदरा वरुन परतवाडाकडे जाणारी वाहतुक ही चिखलदऱ्यावरुन घटांग मार्गे परतवाडा या एक मार्गी पध्दतीने (वन-वे) वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यटनस्थळी राहणार चोख बंदोबस्त
चिखलदरा येथे विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर्षीच्या पावसाळी पर्यटन हंगामात सुमारे २०० पोलीस अधिकारी, अंमलदार आणि १०० होमगार्ड विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. पर्यटनस्थळे, वीव्ह पॉईन्ट, मुख्य रस्ते, गर्दीची ठिकाणे, पार्किंग व्यवस्था तसेच वाहतुक नियमन यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत
पर्यटकांना तात्काळ मदत, मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी १४ पोलीस मोटरसायकल रायडर्सना बॉडी वोर्न कॅमेरा (Body Worn Cameras) तसेच सार्वजनिक सुचना प्रणाली (Public Address System) देण्यात आली आहे. हे १४ पोलीस मोटरसायकल रायडर्स सतत गस्त घालून वाहतूक नियंत्रण, पर्यटकांना मार्गदर्शन तसेच आपत्कालीन परस्थितीत त्वरीत प्रतिसाद देतील.
मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांविरोधात कारवाई
मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्याविरूध्द कठोर कारवाई करण्यासाठी (Drunk & Drive) तपासणी नाके विविध ठिकाणी उभारण्यात आले असून वाहन चालकांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, धोकादायक वाहन चालविणारे, ट्रिपलसीट, हेल्मेट व सीटबेल्ट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
