लोकसत्ता टीम

नागपूर : कोलकात्यामध्ये आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ नागपुरातील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुमारे १ हजार डॉक्टर मंगळवारी सकाळी ९ वाजतापासून संपावर गेले आहे. नागपुरात चिकणगुणिया, डेंग्यूने थैमान घातले असतांना या संपामुळे रुग्णाचे जीव टांगणीला आहे. दरम्यान रुग्ण वाढल्याने सध्या मेयो रुग्णालयात एका रुग्णशय्येवर दोन रुग्ण उपचार घेत आहेत, हे विशेष.

मेडिकल आणि मेयोत सुमारे १ हजार निवासी डॉक्टर सेवा देतात. मंगळवारी सकाळी ९ वाजता या डॉक्टरांनी संपसुरू करत केवळ अत्यावश्यक सेवा देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हे डॉक्टर आयसीयू, आकस्मिक विभागातच सेवा देणार आहे. या संपामुळे निवासी डॉक्टर बाह्यरुग्ण विभाग आणि सामान्य वॉर्डात मात्र दिसणार नाही. त्यामुळे रुग्णांची दमछाक होणार आहे. हे संपकर्ते ९.३० ते १० वाजता दरम्यान मेडिकल, मेयोच्या बाह्यरुग्ण विभाग परिसरात एकत्र येऊन निदर्शन करणार आहे. नागपुरात सर्वत्र चिकनगुनिया, डेंग्यू आणि विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांचे थैमान आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत या रुग्णांवर उपचाराऐवजी येथून रुग्ण थेट मेडिकल, मेयोत पाठवले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे मेयो रुग्णालयात रुग्ण वाढीने एका रुग्णशय्येवर दोघांवर उपचाराची पाळी डॉक्टरांवर आली आहे. नागपूर शहरात १ जानेवारी २०२४ ते १२ ऑगस्ट २०२४ दरम्यान चिकनगुनियाचे ९२६ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी २१० रुग्णांमध्ये या आजाराचे निदान झाले. दरम्यान, या आजाराची लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांची तपासणी करायला खासगी डॉक्टर न लावता उपचार करत असल्याने ही रुग्णसंख्या खूपच कमी दिसत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-रस्त्या-रस्त्याचे असेही भाग्य!

नागपुरात १ जानेवारी २०२४ ते १२ ऑगस्ट २०२४ दरम्यान डेंग्यूचे ९५२ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ७३ रुग्णांमध्ये या आजाराचे निदान झाले. परंतु, एकही मृत्यू या आजाराने झाल्याची नोंद नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, शहरात सर्वत्र विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांचेही रुग्ण वाढले असून सगळ्याच खासगी व सरकारी डॉक्टरांकडे रुग्णांच्या रांगा वाढल्या आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांत या रुग्णांवर उपचाराची अद्ययावत सोय असणे अपेक्षित आहे. परंतु, येथून रुग्ण थेट मेडिकल, मेयोत दाखल करण्यासाठी पाठवले जात आहेत. त्यामुळे मेयो रुग्णालयावर कामाचा प्रचंड ताण वाढला असून येथे १८० खाटांवर दोनशेहून जास्त रुग्ण दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

दरम्यान, मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण म्हणाले, वाढते रुग्ण बघता मेयोतील स्किल लॅबमध्येही ३० ते ४० रुग्णशय्या वाढवण्याची तयारी केली गेली आहे. त्यासाठी तेथे स्वच्छतागृहाचे काम केले जात असून ते होताच येथेही या रुग्णांना ठेवण्याची सोय केली जाणार आहे. तर संपाचा रुग्णांना फटका बसू नये म्हणून वरिष्ठ डॉक्टर आणि वरोष्ठ निवासी डॉक्टरांच्या सेवा लावण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना त्रास होणार नाही.

आणखी वाचा-नागपूर : प्रेयसीची चित्रफित इंस्टाग्रामवर, प्रियकराची रवानगी कारागृहात

संपकर्त्यांची मागणी काय?

  • केंद्रीय प्राधिकरणाकडून या गुन्ह्याचा तात्काळ तपास करून दोषींवर कडक कारवाई करा.
  • या प्रकरणातील आंदोलांकर्त्यांवर पोलीस अत्याचार करू नका.
  • केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ञ समिती करा
    –  आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुसज्ज रक्षक आणि अद्यावत यंत्रणा आणि इतर.