पहिल्याच दिवशी ५० टक्के उपस्थिती; शिक्षणाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

नागपूर : करोना महामारीनंतर पहिल्यांदाच बुधवारी मीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या होत्या. पहिल्या दिवशी एकूण उपस्थितीच्या ५० टक्के इतका म्हणजे विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

करोनामुळे मार्च २०२० पासून सर्व शाळा बंद होत्या. त्यानंतर आता करोनाचा काहीसा प्रभाव कमी होताच राज्यातील शाळा टप्प्यप्प्प्याने सुरू करणे सुरू आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळांनंतर आता पहिल्यांदाच प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरू करण्याची मागणी होत असली तरी यातही दोन मतप्रवाह होते. मात्र, पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील शाळांची उपस्थिती बघता लवकरच शंभर टक्के उपस्थितीनेही शाळा सुरू होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील शाळेत पहिल्याच दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी कळमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गौंडखैरी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आज बऱ्याच दिवसांनी शाळेची घंटा वाजली. प्रार्थनेमुळे शाळा दुमदुमली व वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटामुळे जणू जिवंत झाल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात व्यक्त करता येणे अवघड आहे. त्यांना बघून शिक्षकांचेही खूप समाधान झाले.

नियमांचे काटेकारे पालन

शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित होताच त्यांची थर्मल तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी सुरक्षित व्यवस्था, स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था, शाळेच्या परिसरातील स्वच्छता अशा विविध बाबींची शाळांमध्ये काळजी घेण्यात आली होती. अनेक अनुदानित शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी स्वत: उपस्थित राहून सर्व पाहणी केली.

पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या तोंडावरच करोनाच्या विषाणूचा नवीन उत्परिवर्तीत प्रकार समोर आल्याने पालकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार असल्या तरी पहिल्या दिवशी उपस्थिती राहणार की नाही याबाबत शाशंकता होती. मात्र, पालकांनी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालक शाळेत सोडून देताना दिसून आले.

उपस्थिती अशी होती..

नागपूर जिल्ह्यातील करोना नियम पाळत इयत्ता १ ते ४ पर्यंत वर्गाची सर्व शाळांची सुरुवात आजपासून झाली. आज ग्रामीण भागातील १३ तालुक्यातील २०२१ शाळांपैकी १८९८ शाळा सुरु झाल्या. ग्रामीण भागात १ लाख २८ हजार ९१ विद्यार्थी असून त्यापैकी ६४ हजार ७८० विद्यार्थी आज उपस्थित होते. तर ५ हजार ९५६ पैकी ५ हजार ५६९ शिक्षक उपस्थित होते. नागपूर महानगरपालिका वगळून शहरी भागातील इयत्ता १ ते ७ च्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. इयत्ता १ ते ७ च्या २८७ शाळेपैकी २५१ शाळा सुरु झाल्या असून ५२ हजार ६६१ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ७७४ विद्यार्थी उपस्थित होते. तर २ हजार २०३ शिक्षकांपैकी १ हजार ५४९ शिक्षक शाळेत उपस्थित होते.

विद्यार्थी, शिक्षकही आनंदी

कालपर्यंत विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होती. आज विद्यार्थी शाळेत येताच याचा आनंद विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही दिसून आला. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लक्षणिय उपस्थिती होती. यावरून पालाकंच्या मनातील करोनाचे भय कमी झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले.

लीलाधर ठाकरे, मुख्याध्यापक.

पहिल्यांदाच शाळेचा अनुभव

जवळपास दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने अनेक मुलांना शाळेत जाताच आले नव्हते. करोनामुळे शाळा कधी सुरू होतील याची अनिश्चितता असल्याने अनेक मुलांना शाळेत दाखलच करण्यात आले नव्हते. कोराडी येथील पालक राकेश भालाधरे यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा आज पहिल्यांदाच शाळेत जात आहे. चिमुकल्यांची पहिल्यांदाच शाळा सुरू झाल्याने अनेक मुलांसाठी शाळेत पहिल्यांदाच येण्याचा अनुभव घेता आला.