नागपूर : उपराजधानीत मोठय़ा व्यक्तींचे यकृत प्रत्यारोपण वाढत असले तरी लहान मुलांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आवश्यक सोयी नाही. त्यामुळे नातेवाईकांना दिल्ली, मुंबईसह मोठय़ा शहरातील प्रत्यारोपण केंद्रात जावे लागत होते. येथील एका खासगी रुग्णालयांतील केंद्रात आवश्यक बालरोग तज्ज्ञांसह इतर सोयी उपलब्ध झाल्यामुळे आता मुलांचे यकृत प्रत्यारोपण उपराजधानीतच शक्य झाले आहे.

विदर्भात मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान वाढत असल्याने विविध अवयवांच्या प्रत्यारोपणाची संख्या वाढली आहे.  गेल्या वर्षभरात एकटय़ा नागपुरात अवयव प्रत्यारोपणामुळे ११६ हून अधिक जणांना नवजीवन मिळाले. दरम्यान, शहरात सध्या यकृत प्रत्यारोपण करणारी न्यू ईरा रुग्णालय, वोक्हार्ट रुग्णालय, एलेक्सिस रुग्णालयासह इतर काही खासगी केंद्र आहेत, परंतु येथे लहान मुलांचे प्रत्यारोपण करण्यासाठी आवश्यक बालरोग तज्ज्ञांसह इतर काही सोयी नव्हत्या.

आजारी मुलाला धोका नको म्हणून पालक त्यांच्या प्रत्यारोपणासाठी दिल्ली, मुंबई, पुण्यासह मोठय़ा शहरातील केंद्रातच जात होती. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसाही तुलनेने अधिक जास्त खर्च होत होता. उपराजधानीत सर्वाधिक यकृत  प्रत्यारोपण करणाऱ्या न्यू ईरा रुग्णालयात नुकतेच न्यूनोनेटेलॉजिस्ट आणि अत्यवस्थ बालकांच्या उपचाराच्या सर्व सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता येथे मोठय़ांसह मुलांचेही यकृत प्रत्यारोपण शक्य झाले आहे. शहरात मेंदूमृत रुग्णांच्या झालेल्या अवयवदानात मुलांचीही संख्या मोठी आहे. लहान मुलांचे यकृत जन्मजात दोषासह भविष्यात काही आजारांमुळेही निकामी होऊ शकते, परंतु मोठय़ांच्या तुलनेत हे प्रमाण फार कमी आहे.

‘‘लहान मुलांवर यकृत प्रत्यारोपण झाल्यावर बालरोग तज्ज्ञ त्यांच्यावर लक्ष ठेवतात. त्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभागासह मोठय़ा प्रमाणात यंत्रसामुग्री लागते. ती उपलब्ध झाल्यामुळे आता नागपुरातच मुलांवर यकृत प्रत्यारोपण शक्य होईल.’’

– डॉ. आनंद संचेती, न्यू ईरा रुग्णालय, नागपूर.