सततच्या सर्दी, ताप, खोकल्याने मुले बेजार ; नागपुरातील बालरोग तज्ज्ञांचे निरीक्षण |Children sick with fever and cold Observation by a pediatrician nagpur | Loksatta

सततच्या सर्दी, ताप, खोकल्याने मुले बेजार ; नागपुरातील बालरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

तापमानातील चढ- उतारामुळे घराघरात सर्दी, खोकला तापाचे रुग्ण वाढले. सर्वाधिक रुग्ण हे लहान मुलांच्या वयोगटातील आहेत.

सततच्या सर्दी, ताप, खोकल्याने मुले बेजार ; नागपुरातील बालरोग तज्ज्ञांचे निरीक्षण
संग्रहित छायाचित्र

नागपूर : एकदा मुलांना विषाणू संसर्गामुळे (व्हायरल) सर्दी, खोकला, ताप आल्यास उपचाराने त्यापासून लढण्याची प्रतिकार शक्ती विकसित होते. त्यानंतर सामान्यपणे लगेच मुलांना हा त्रास होत नाही. परंतु यंदा एकदा ताप येऊन गेल्यावरही काही दिवसानंतर पुन्हा दोन-तीन वेळा मुले आजारी पडत असल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. वारंवारच्या सर्दी, खोकला, तापाने मुले बेजार झाली आहेत.
उपराजधानीतील ऊन-पावसाचा खेळ थांबण्याचे नाव घेत नाही.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

मध्यंतरी पावसाने उसंत घेतली होती. परंतु काही दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. तापमानातील चढ- उतारामुळे घराघरात सर्दी, खोकला तापाचे रुग्ण वाढले. सर्वाधिक रुग्ण हे लहान मुलांच्या वयोगटातील आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सामाजिक रोग प्रतिबंधक शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनीही यंदा मुले वारंवार आजारी पडत असल्याचे मान्य केले.

डॉ. गावंडे म्हणाले, पूर्वी एकदा विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मुले बरी झाल्यावर त्यांच्यात प्रतिकारशक्ती विकसित होत होती. त्यामुळे सहसा पुन्हा लगेच संक्रमण होत नसे. परंतु यंदा अनेक मुले बरी झाल्यावरही काही दिवसांनी पुन्हा त्यांना आलटून-पालटून आजारी पडताना दिसतात. संक्रमित विषाणूमध्ये म्युटेशन झाल्यास मुलांची जुनी प्रतिकारशक्ती काम करत नाही. परिणामी मुले वारंवार आजारी पडत असल्याचीही शक्यता नकारता येत नाही, असे डॉ. गावंडे म्हणाले.

हेही वाचा : उपराजधानीवर पुन्हा डेंग्यूचे सावट ; आरोग्य विभागाची चिंता वाढली

मुलांमध्ये फेरतापाचे प्रमाण अधिक

उपराजधानीतील अनेक बालरोग तज्ज्ञांकडे सध्या उपचाराला येणाऱ्या मुलांपैकी ७० टक्के ही विषाणू संसर्गाच्या त्रासापोटी येत आहेत. यापैकी निम्म्या संखेत मुले यापूर्वी यातून बरी झालेली असतात व त्यांना पुन्हा सलग दुसऱ्यांदा वा तिसऱ्यांदा ताप, सर्दी खोकला झालेला असतो, असे डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.

हेही वाचा : नागपूर : शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या प्रेयसीवर प्रियकराचा बलात्कार

डेंग्यू वाढण्याचा धोका

जिल्ह्यात पाऊस थांबल्यानंतर डेंग्यू रुग्णाच्या संख्येत घट झाली होती. परंतु पुन्हा पाऊस पडत असल्याने डेंग्यू डोके वर काढण्याची शक्यता आहे, असे सामाजिक रोग प्रतिबंधात्मकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. समीर गोलावार यांनी सांगितले.
औषधांचा ‘कोर्स’ पूर्ण करावा

तापमानात खूपच चढ-उतार होत असल्याने मुले वारंवार आजारी पडतात. अनेकदा पालक रुग्णाला बरे वाटल्यावर औषध घेेणे परस्पर थांबवतात. अनेक जण निर्धारित मुदतीत डॉक्टरांकडे जात नाहीत. रुग्णाला बरे झाले असे वाटत असले तरी शरीरात काही प्रमाणात विषाणू असतात. ते पुन्हा वेगाने पसरतात. त्यामळे मुले पुन्हा आजारी पडतात, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचित बागडे म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-10-2022 at 16:00 IST
Next Story
नागपूर : भ्रष्ट व्यवस्थेला बळी पडला उमा बॅरेज सिंचन प्रकल्प