बालसुधारगृह की पलायनगृह?

गुन्हे करताना आढळलेली आणि आईवडिलांपासून दुरावलेली, अशी दोन्ही प्रकारची मुले येथे आहेत

तीन वर्षांत दुसऱ्यांदा मुले पळाली; बालसुधारगृहाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
बालसुधारगृहातून मुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न करण्याची घटना गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा घडल्याने बालसुधारगृहाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी २०१३ मध्ये येथून १७ मुले पळून गेली होती. गेल्या रविवारी घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनाने स्वत:चीच बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात मुलांना येथे होणारा जाच आणि व्यवस्थापकीय त्रुटी त्यासाठी कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आहे.
उपराजधानीच्या या बालसुधारगृहात ६ ते १८ वयोगटातील ४५ मुले आहेत. यातील २१ मुलांनी रविवारी रात्री ८.३० ते ९ वाजेच्या दरम्यान पोबारा केला. यासंदर्भात बालसुधारगृह प्रशासनाने दिलेले उत्तर बुचकाळ्यात टाकणारे आहे. रोजंदारी चौकीदाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकून स्वयंपाकगृहाचे दार काढून मुले पसार झाल्याचे प्रभारी अधीक्षक एम.एस. झाडे यांनी सांगितले. मात्र, चौकीदार हा इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसत असल्याने मुलांनी चौकीदाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकून स्वयंपाकगृहातून पोबारा कसा केला, हे गुढच आहे.
गुन्हे करताना आढळलेली आणि आईवडिलांपासून दुरावलेली, अशी दोन्ही प्रकारची मुले येथे आहेत. यात बराच मुले परराज्यातील आहेत. बालसुधारगृहासाठी मंजूर ११ पैकी पाच पदे रिक्त आहेत. चौकीदाराची चार पदे आहेत, पण केवळ दोनच भरण्यात आली आहेत. तिसरा चौकीदार सुनील भिलकर हा रोजंदारीवर नुकताच लागलेला होता. त्याला बालसुधारगृह आणि मुलांसंदर्भात फारशी माहिती नव्हती. पळून गेलेली मुले १० ते १८ वयोगटातील होती आणि मानसिकरीत्या अस्थिर असल्याने चौकीदाराला त्याचा अंदाज आला नाही, असे झाडे म्हणाले. कनिष्ठ बालगृहात परिविक्षा अधिकारी असलेले एम.एस. झाडे यांच्याकडे सध्या बालसुधारगृहाच्या अधीक्षकपदाचा प्रभारी कार्यभार आहे. एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या कसे सांभाळणार, असा सूर त्यांच्या बोलण्यातून यावेळी उमटला. मुलांच्या पळून जाण्यामागे त्यांनी येथील अपुऱ्या कर्मचाऱ्यांविषयीचा पाढा वाचला. समुपदेशक जक्कुलवार यांनीही त्यांचीच री ओढली. मुलांना भेटू देणे तर दूरच, पण स्वयंपाकगृहाची ती जागा दाखवण्यासही त्यांचा नकार होता. पळून गेलेल्यांपैकी मुळातच काही मुले गुन्हेगारी पाश्र्वभूमीतून आली असली तरीही सर्वच मुले तशी नाहीत. रविवारी पळून गेलेल्यांपैकी १२ मुले परत आली आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचे कळते.

मुलाला सोडण्यासाठी २० हजारांची मागणी
रेल्वेस्थानकावर मुले दिसली की, अधिक चौकशी न करता त्यांना थेट बालसुधारगृहात आणण्याचे प्रकारही घडतात. अमरावतीच्या एका सात वर्षांच्या मुलाला असेच या बालसुधारगृहात आणले गेले. डोळ्याने कमी दिसणारा हा मुलगा रेल्वेस्थानकावर नळाचे पाणी बाटलीत भरत होता आणि आई थोडे दूर उभी होती. या मुलाला तडक उचलून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. त्याची आई मुलाला नेण्यासाठी आली असता तिला मुलाला भेटू देण्यात येत नव्हते. त्याला सोडण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार त्यांनी केली.
नातेवाईकांना भेटण्यास मनाई
बालसुधारगृहातून मुले पळून गेल्याच्या घटनेनंतर अनेकजण, त्याचे नातेवाईक मुलांना ते सुरक्षित आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी आली होती. मात्र, बालसुधारगृहाच्या प्रशासनाने त्यांना बाहेरच थांबवून ठेवले. पळून गेलेल्यांमध्ये तुमची मुले नाहीत, तर ते सुरक्षित आहेत अशी बतावणी प्रशासनाकडून करुन त्यांना आत जाऊ देण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे ते नातेवाईक बराच वेळ बाहेरच ताटकाळत उभे होते.
मानसिक व शारीरिक छळ
बालसुधारगृहातील मुलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन याठिकाणी प्रचंड मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे एका मुलाच्या नातेवाईकाने सांगितले. या मुलांना धड खायला मिळत नाही आणि त्यांच्याकडून शारीरिक कष्टाची कामे करुन घेतली जातात. बालसुधारगृहाच्या स्वयंपाकगृहाच्या मागे असलेल्या भिंतीवरुन उडी मारुन त्याठिकाणी असलेल्या घरांमध्ये ही मुले खायला मागतात. या मुलांवर शारीरिक अत्याचारसुद्धा होत असल्याचा आरोप या नातेवाईकाने केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Childrens abscond from rehab centre