चंद्रपूर: आर्थिक गुन्ह्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. मागील दहा वर्षात राज्यातील विविध चिटफंड कंपन्यांनी चंद्रपुरात कार्यालय सुरू करून जनतेला आर्थिक लाभाची विविध आमिष दाखवून ५५० कोटी रुपयांनी गंडा घातला आहे. हा आकडा २०१३ ते २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीतील आहे. या दहा वर्षात आर्थिक गुन्हे शाखेकडे ३७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणांचा तपास सुरू आहे. दरम्यान, अनेक प्रकरणांचा तपास थंडबस्त्यात पडला असल्याने नागरिक गुंतविलेले पैसे मिळण्याची वाट बघत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील युवक, युवती, भगिनी, नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांनी आर्थिक प्रलोभनाला बळी पडून विविध चिटफंड कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र, काही वर्षांत या कंपन्यांनी हात वर केल्याने फसवणूक झाली आहे. अनेक नागरिकांनी पोलीस विभागाकडे तक्रारी केल्यानंतरही गुंवविलेला पैसा अजूनही मिळाला नाही. यापैकी काही प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. दरम्यान, मैत्रेय या कंपनीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १९४ कोटी रुपये फसले असून, अनेक प्रकरणे आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रलंबित आहे. दरम्यान, एका राजकीय नेत्यालाही या फसवणुकीसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली असल्याने चिटफंड कंपन्यांच्या फसवणूकीत काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा हात असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : बावनकुळे म्हणाले “मुले कोणाची…बारसे कोण करतय…”
चिटफंड कंपन्यांकडून झालेली फसवणूक व यामध्ये असलेला राजकीय हस्तक्षेप बघता या प्रकरणांची चौकशी संथगतीने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २००७ ते २०१७ या दशकात विविध चिटफंड कंपन्यांमार्फत नागरिकांना भूलथापा देत शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची फसवणूक केली आहे. या प्रकारामुळे अनेक जण रस्त्यावर आले असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. चिटफंड कंपन्यांनी सुरुवातीला मोठमोठी आमिषे दाखवून एजंटांच्या माध्यमातून नागरिकांना टार्गेट केले. कोट्यवधींच्या घरात रक्कमा जमा झाल्यानंतर पोबारा केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील हा आकडा ५५० कोटींच्या घरात असून, इतर जिल्ह्यातील फसवणुकीचा विचार केल्यास राज्यभरात ५० हजार कोटींच्या घरात ही रक्कम जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने चिटफंड कंपन्यांच्या मुसक्या आवळून नागरिकांना रक्कम देण्यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे.
काही चिटफंड कंपन्यांनी जिल्ह्यातील विविध कोळसा खाणी, सिमेंट कंपनी तथा उद्योग असलेल्या भागात कार्यालय सुरू करून तेथील नागरिकांची फसवकुन केली आहे. मागील दहा वर्षापासून या सर्व आर्थिक गुन्हांचा तपास सुरू असला तरी ज्या गुंतवणूकदरानी या कंपनी मध्ये लाखोंची गुंतवणूक केली आहे त्यांना पैसे परत मिळालेले नाही. विशेष म्हणजे आता तर पैसे मिळण्याची शक्यताही मावळली आहे. आज एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीचा आकडा ५५० कोटीच्या घरात आहे. अनेकांनी तर जमिनी खरेदी विक्रीच्या कंपनी उघडून देखील लोकांची आर्थिक फसवकून केली आहे. फसवणूक झाल्यानंतर आता संबंधित व्यक्ती पोलिस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा तसेच न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात विविध चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ५५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली असून आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरणे प्रलंचित आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांची घोषणा केली. मात्र, चिटफंड कंपन्यांच्या फसवणुकीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असताना दबाव ही आणला जात असून, निःष्पक्ष चौकशी करण्यातही अडचणी येत आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख यांना पत्र लिहून पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली रवींद्र शिंदे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा) चंद्रपूर यांनी केली आहे. फसवणूक झालेल्या लोकांना न्यान मिळवून द्यावा असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
© The Indian Express (P) Ltd