अमरावती: येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेला गावी जाण्यासाठी रुग्णालयाचे वाहन उपलब्ध असतानाही वाहनात डिझेल नसल्याचे कारण सांगण्यात आल्याने नवजात बाळासह आणि सासूसोबत रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसून राहण्याची वेळ या महिलेवर आली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त करीत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.
नेमके काय घडले?
जिल्हा स्त्री रुग्णालयातील शिशू अतिदक्षता विभागात गेल्या सोमवारी लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांना मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार चित्रा वाघ यांनी शनिवारी रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांना रुग्णालयाच्या पायऱ्यांवर एक महिला बाळासह बसून असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी लगेच पोहचून याविषयी प्रशासनाकडे जाब विचारला. मूळची मध्यप्रदेशातील रिना उइके ही महिला कामानिमित्त माहुली जहागिर येथे वास्तव्यास आहे. आठ दिवसांपुर्वी प्रसूतीसाठी या महिलेला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर आज तिला परत गावी जाण्यासाठी रुग्णालयाचे वाहन उपलब्ध होते, पण डिझेल नसल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले.
चित्रा वाघ संतापल्या
या ठिकाणी रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी कुणीही समन्वयक उपस्थित नाही. एक महिला बाळाला घेऊन पायऱ्यांवर बसून असल्याचे रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या लक्षात का आले नाही. आधी वाहनाची व्यवस्था करा, अशी सूचना चित्रा वाघ यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांना केली. आम्ही या ठिकाणी आलो नसतो, तर काय झाले असते, असा सवाल त्यांनी केला. सरकार चांगले काम करीत असताना प्रशासनाच्या अशा चुकीच्या कामांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होते, सरकारला बदनाम काम करण्याचे काम चालले आहे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला.
खासगी वाहनातून रुग्णाचा प्रवास
जिल्हा स्त्री रुग्णालयातून रुग्णांना इतरत्र हलवण्याची वेळ आल्यानंतर त्यांना खासगी वाहनातून जावे लागते, अशी व्यथा काहींनी बोलून दाखवली. थोड्या वेळाआधी एका गर्भवती महिलेला नागपूर येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी नागपूर येथे आमची व्यवस्था नसल्याचे सांगितले. अखेरीस या महिलेच्या कुटुंबीयांनी तिला डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिला खासगी वाहनातून नेण्यात आल्याचे चित्रा वाघ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले, त्याविषयी देखील वाघ यांनी जाब विचारला.
