वर्धा : कोरडवाहू व बागायती शेतीत उत्तम काय, हे महाराष्ट्रातील शेतकरी चांगले समजून आहे. पाण्यावर फुलणारी व कोरडवाहू शेतीचे परिणाम काही जाणतात. म्हणुन पाणी मिळावे यासाठी तंटे होत असतात. त्यासाठी पाणी वाटप समित्या तयार होतात. सांगायचे असे की हाती मुबलक पाणी असेल तर शेती फुलणार. पण शेतीचे हे पाणी केवळ पक्ष्यांसाठी राखीव ठेवून एकच पीक घेण्याचा सदभाव विरळच. तो दिसलाय. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तो जगापुढे आणलाय.

स्वतःच्या दुबार पिकाचा त्याग

केवळ स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांना पिण्यासाठी अन् राहण्यासाठी पाणी कमी पडू नये म्हणून स्वतःच्या दुबार पिकाचा त्याग करणारे शेतकरी तुम्ही कधी पाहिले आहेत का? तमिळनाडू राज्यातील ‘चित्रंगुडी’ (Chitrangudi) या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांनी निसर्गप्रेमाचा असाच एक थक्क करणारा आणि प्रेरणादायी आदर्श जगासमोर ठेवला आहे. दुबार पिकाचा त्याग अन् पक्ष्यांचे रक्षण साधले आहे.

चित्रंगुडी अभयारण्य

तमिळनाडूमधील चित्रंगुडी पक्षी अभयारण्य (Chitrangudi Bird Sanctuary) हे एक महत्त्वाचे पाणथळ क्षेत्र आणि पाण्याचा मोठा साठा (Reservoir) आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास शेतात दुसरे पीक घेण्याची स्थानिक शेतकऱ्यांची तीव्र इच्छा असते. फेब्रुवारीमध्ये दुबार पीक घेतले तर प्रत्येक कुटुंबाला चांगला आर्थिक हातभार लागू शकतो.

मात्र याच काळात या पाणथळ क्षेत्रात हजारो परदेशी व दुर्मिळ पक्षी वास्तव्यासाठी येतात. जर शेतकऱ्यांनी पिकांच्या सिंचनासाठी या जलाशयातील पाणी वापरले, तर पक्ष्यांसाठी पाणी अपुरे पडेल अन् त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. म्हणून पक्ष्यांचा निवारा आणि त्यांचे जीवन सुरक्षित राहावे या एकाच ध्येयाने हे शेतकरी स्वतःच्या आर्थिक फायद्याचा विचार न करता दुबार पिकाची पेरणी टाळतात आणि सिंचनाचे पाणी पक्ष्यांसाठी जपून ठेवतात.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून गौरव

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEF&CC) आपल्या ‘RamsarSpotlight’ या उपक्रमांतर्गत चित्रंगुडी अभयारण्याचा आणि येथील गावकऱ्यांच्या त्यागाचा विशेष उल्लेख करत त्यांचे कौतुक केले आहे. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी या चित्रंगुडी पाणथळ क्षेत्राला आंतरराष्ट्रीय महत्त्वाची ‘रामसर जागा’ (Ramsar Site) म्हणून अधिकृत दर्जा मिळाला आहे.

मानवी गरजा आणि निसर्गाचे रक्षण या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल कसा साधावा, याचे चित्रंगुडी गाव हे एक जिवंत उदाहरण ठरले आहे. पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे म्हणजे केवळ कायदे करणे नव्हे, तर उपलब्ध नैसर्गिक संसाधनांची निसर्गासोबत विभागणी करणे शिकणे होय, हाच मोलाचा संदेश या गावाने दिला आहे.

सहअस्तित्वाचा अनोखा पाठ

चित्रंगुडी अभयारण्यात फेब्रुवारीच्या काळात अनेक प्रजातींचे पक्षी प्रजननासाठी आणि पिल्लांचे संगोपन करण्यासाठी येतात. अशा नाजूक काळात पाणी कमी झाले तर पक्ष्यांची घरटी आणि पिल्ले नष्ट होण्याचा धोका असतो. हीच संवेदनशील बाब ओळखून गावकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या ही हरित परंपरा जपली आहे. आजच्या काळात जिथे पाण्यासाठी आणि जमिनीसाठी वाद निर्माण होतात, तिथे स्वतःचे नुकसान सहन करून पक्ष्यांसाठी पाणी वाचवणारे हे शेतकरी खऱ्या अर्थाने निसर्गाचे रक्षक ठरले आहेत.