अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘काॅलरा’ आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक येथील एका रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हा रुग्ण कॉलराबाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे या गावात कॉलरा उद्रेक जाहीर करण्यात आला असून, प्रतिबंधात्मक कार्यवाही व उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
‘कॉलरा’ हा एक तीव्र अतिसार आणि उलट्या होणारा रोग आहे. हा रोग दूषित पाणी किंवा अन्नातून पसरतो. या रोगावर वेळेवर उपचार न झाल्यास, निर्जलीकरणामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. याच प्रकारे जिल्ह्यातील धामणा गावातील एका रुग्णाचा कॉलरामुळे मृत्यू झाला. कॉलरा ‘व्हिब्रिओ कॉलरे’ नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो.
हा बॅक्टेरिया दूषित पाण्यात किंवा अन्नातून शरीरात प्रवेश करतो. तीव्र अतिसार, उलट्या, निर्जलीकरण, स्नायू पेटके, थकवा,अशक्तपणा आदी कॉलराची लक्षण आहेत. ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसते, तिथे ‘कॉलरा’चा धोका वाढतो. ग्रामीण भागात नागरिकांना ‘कॉलरा’ रोगाची लागण झाल्याची लक्षणे दिसून येत आहे.
दूषित पाण्यामुळे आजार झाल्याचे निदर्शनास आले. आजाराच्या प्राथमिक लक्षणानुसार गावातील नागरिकांना अतिसार व उलट्या होत असून त्यानुसार प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार केला जात आहे. आरोग्य विभागाच्या चार पथकांद्वारे धामणा गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. पिण्याचे पाणी उकळून व आर. ओ. पाण्याचा वापर किंवा मेडिक्लोरचा उपयोग करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने नागरिकांना दिल्या आहेत. करोडी येथील उपकेंद्रामार्फत औषधोपचार होत आहेत. गावात ८० घरे असून, प्रत्येक घरी तपासणी करण्यात आली आहे. ताप, मळमळ, पोटदुखी, हगवण, डोकेदुखी अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना तातडीने उपचार मिळवून देण्यात येत आहेत.
ठिकठिकाणच्या पाण्याचे १५ नमुने तपासण्यात येत आहेत. सर्वेक्षण व उपचारासाठी दोन वैद्यकीय अधिकारी, एक समुदाय आरोग्य अधिकारी, दोन आरोग्य सहायक, चार आरोग्यसेवक, तीन आशासेविका, अंगणवाडी सेविका आदी मनुष्यबळ कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्याकडून साथ नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना ताप, मळमळ, हगवण, पोटदुखी, डोकेदुखी असे कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित गावात पथकामार्फत तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे यांनी केले आहे.