चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील नवेगाव (रामदेगी) येथील शेतकरी राजू भोयर यांचा बरडघाट शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू भोयर हे आपल्या शेतात पिकांच्या संरक्षणासाठी बांबूचे कुंपण उभारण्याचे काम करण्यासाठी गेले होते. त्यांचे शेत ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत आहे.  दबा धरून बसलेल्या वाघाने सायंकाळी चार वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात राजू भोयर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. स्थानिक नागरिकांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू आहे.

वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात असून वन विभागाने परिसरात सतर्कता वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.