ख्रिश्चन धर्मगुरुची नक्षल्यांकडून हत्या | Loksatta

ख्रिश्चन धर्मगुरुची नक्षल्यांकडून हत्या

पाच वर्षांपूर्वीच्या या घटनाक्रमानंतर पांडाला चळवळीतून हद्दपार केले.

ख्रिश्चन धर्मगुरुची नक्षल्यांकडून हत्या
संग्रहित छायाचित्र

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील प.गोदावरी जिल्ह्य़ातील घटना

शहीद सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी प्रथमच एका ख्रिश्चन धर्मगुरुची खबरी असल्याच्या संशयावरून हत्या प्रार्थनास्थळे संचालित करणाऱ्या ख्रिश्चन समुदायात दहशत पसरली आहे.

नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात हा सप्ताह पाळतात व चळवळीत मारल्या गेलेल्या सहकाऱ्यांचे स्मरण केले जाते.

गेल्या शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ातील चिंतूर लच्चीगुडा गावातील ख्रिश्चन धर्मगुरु उईके मारय्या यांना गोळी घालून ठार केले. पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी ही हत्या केली. नक्षलवाद्यांनी ख्रिश्चन व्यक्तीला ठार मारल्याची ही पहिलीच घटना आहे. आजवर शेकडो आदिवासींचे बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांनी ख्रिश्चन समुदायाला कधीच लक्ष्य केलेले नव्हते. दंडकारण्यातील आदिवासींचा मोठा पाठिंबा आहे, असा दावा नेहमी करणाऱ्या नक्षलवाद्यांनी या समाजात होत असलेल्या धर्मातरणाच्या मुद्यावर सुद्धा आजवर कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती. नक्षलवाद्यांचा ओदिशा राज्याचा प्रमुख सव्यसाची पांडाने नेमका हाच मुद्दा समोर करून नक्षलवादी चळवळीचा प्रमुख गणपतीला एक जाहीर पत्र लिहिले होते. त्याला उत्तर देताना गणपतीने धर्म हा माओचा मुद्दा कधीच नव्हता, असे उत्तर दिले होते. पाच वर्षांपूर्वीच्या या घटनाक्रमानंतर पांडाला चळवळीतून हद्दपार केले.

दुर्गम भागातील आदिवासीबहुल गावांमध्ये सेवाकार्य व कार्यविस्ताराचे काम करणाऱ्या ख्रिश्चन समुदायातील व्यक्तींकडे नक्षलवाद्यांनी आजवर कधीच लक्ष दिले नाही. त्यांना कधी त्रासही दिलेला नाही. चर्च असो वा मंदिर यापासून ही चळवळ कायम दूर राहिली. खबरी असल्याच्या संशयावरून ज्या धर्मगुरुला ठार करण्यात आले, त्याचा पोलिसांशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. चर्चमधील नेहमीच्या कामातच ते व्यस्त असायचे. दुर्गम भागात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर चर्चने कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही. तरीही चर्चच्या धर्मगुरुला लक्ष्य केले जात असेल तर ते चिंताजनक आहे, असे मत गडचिरोली जिल्ह्य़ातील धर्मप्रचारकाने सोमवारी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केले.

गडचिरोली जिल्ह्य़ात तरुणाची हत्या

शहीद सप्ताहाच्या पाचव्या दिवशी राकेश कारू गावडे (२३) या तरुणाची सोमवारी नक्षलवाद्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. गेल्या सात महिन्यात नक्षल्यांनी केलेली ही चौदावी हत्या आहे. या हत्येमुळे सर्वत्र दहशत व भीतीचे वातावरण आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या चकमकीत एका महिला नक्षलवादी ठार झाल्याने याचा बदला घेण्यासाठी नक्षलवादी मोठी घटना घडविण्याच्या तयारीत आहेत. उपविभाग अहेरींतर्गत उपपोलिस ठाणे पेरमिली हद्दीतील गुर्जा येथील राकेश कारू गावडे हा पदवीच्या दुसऱ्या वर्षांला शिकत होता. तो गावक ऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन मदत करायचा. राकेशला सोमवारी पहाटे पेरमिली दलमचे नक्षलवाद्यांनी गावातून तुमरकसा येथे नेऊन त्याला गोळ्या घातल्या.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2016 at 01:54 IST
Next Story
आता शिधापत्रिकाधारकांचे धान्य खुल्या बाजारात विकण्यावर टांच