बदलापूर: गेल्या काही महिन्यांपासून बदलापूर शहरातील महावितरणच्या कारभारामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहे. दिवसा आणि रात्रीही विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. शुक्रवारी पूर्व भागात सुमारे अकरा तास वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत वीज नव्हती. रविवारीही दुपारपर्यंत वीज नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत होती. त्याचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला. तर रात्री झोपेचे खोबरे झाल्यानंतर एकमेव सुट्टीचा दिवसही विजेविना काढावा लागल्याने नागरिक हैराण झाले होते.

बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळ खंडोबा झाला आहे. सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, रात्री होणारा बिघाड, त्यात तो बिघाड सोडवण्यासाठी लागणारा तासनतास वेळ यामुळे बदलापूरकर संतापले आहेत. बदलापूर शहरातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी याविरुद्ध आंदोलन केली. मात्र तरीही विजेचा प्रश्न काही सुटू शकलेला नाही. त्यातच भरीसभर शुक्रवारी बदलापूर पूर्वेतील आणि पश्चिम मधील काही भागात जवळपास ११ तास वीज पुरवठा खंडित होता. शनिवारी रात्री उशिरा खंडित झालेला वीजपुरवठा सुरू होण्यास पहाटेचे चार वाजले. यावेळी मोठा बिघाड झाल्याचे कारण महावितरणाचे कर्मचारी सांगत होते. त्यामुळे त्या दुरुस्तीसाठी रविवारी पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तो दुपारी दोन पर्यंत पूर्ववत झालेला नव्हता. त्यातच सायंकाळी पुन्हा बदलापूर पूर्वेतील काही भागात वीज गायब होती. त्यामुळे नागरिकांचा सुट्टीचा एकमेव रविवार सुद्धा वाया गेला. दुरुस्तीच्या नावाखाली सातत्याने वीज पुरवठा बंद केला जातो. दिवसा दुरुस्ती आणि रात्री बिघाड त्यामुळे वीज फक्त इन्व्हर्टर चार्ज करण्यासाठी येते का असा उपहासात्मक प्रश्न नागरिक विचारू लागले आहे.

अधीक्षकांची भेट

रविवारी कल्याण मंडळाचे अधीक्षक अभियंता सी. मिश्रा यांनी बदलापुरातील वीज समस्येचा आढावा घेतला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. पूर्वेतील कर्जत रस्त्यावर वेंकिज हॉटेल जवळ भुयारी वाहिनी नादुरुस्त झाल्याने वीज पुरवठ्यात अडचण झाली. दोन दिवसांपूर्वी मोरिवली केंद्रात बिघाड, तसेच आनंद नगर येथील रोहित्र नादुरुस्त झाला. त्यातच वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वाहिन्या एकमेकांना चिटकत असल्याने वीज खंडित होत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच यातून दिलासा मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महावितरणचे बदलापूर कार्यकारी अभियंता आनंद काटकर उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलापुरात पाणीबाणी

पूर्वेतील खंडित वीज पुरवठ्याचा फटका बदलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बसला. मध्यरात्रीपासून पहाटे सुमारे ४ वाजेपर्यंत जलशुद्धीकरण आणि पाणी उपसा केंद्र बंद असल्याने शहरातील विविध भागात पाणीपुरवठा झाला नाही. तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे वीज आणि पाण्याविना बदलापूरकरांचे हाल वाढलेले आहेत.