‘एमपीएससी’ लवकरच वेळापत्रक जाहीर करणार

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्थापत्य अभियांत्रिकी पदाच्या सुधारित निकाल यादीनंतर भरती प्रक्रियेतून बाद झालेल्या एका उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने मुलाखती रखडल्या होत्या. मात्र, आता न्यायालयाने हा मार्ग मोकळा केला असून न्यायालयाच्या अधीन राहून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलाखती  एमपीएससी घेणार आहे.

स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४५ जागांसाठी सुरुवातीला ३६०० उमेदवारांची निवड करण्यात आली होती. ५ जुलैच्या शासन निर्णयानुसार या ११४५ जागांमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी असलेल्या १३ टक्के जागा खुल्या वर्गामध्ये रूपांतरित करण्यात आल्या. यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील कमी गुण असणारे काही उमेदवार वगळले गेले. यातील एका उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुधारित यादीला आव्हान देणारी याचिका दाखल केली. मात्र, सुधारित याद्या या सर्वोच्च न्यायालयाचा ५ मेचा निकाल आणि ५ जुलैच्या शासन निर्णयाच्या अधीन राहून होत असल्याने एका सुनावणीत निकाली निघणाऱ्या याचिकेसाठी वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप उमेदवारांकडून होत होता. विद्यार्थ्यांचा वाढता दबाव बघता यासंदर्भात आयोग सकारात्मक असून मुलाखती घेण्यासाठी न्यायालयाला विनंती केली जाणार असल्याची माहिती एमपीएससीचे सदस्य डॉ. दयावान मेश्राम यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर आयोगाने दोन दिवसांआधी न्यायालयाला स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलाखतीसाठी विनंती केली. ती मान्य करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयाच्या अधीन राहून आता एमपीएससी स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलाखती घेणार आहे. या मुलाखती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर  मुलाखती होणार असल्याने विद्यार्थ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.