नागपूर : परीक्षा पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवरून चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) ‘जेन-झी रायझिंग टूर’ची सुरुवात नागपुरातून होणार आहे. येत्या २७ ऑगस्टला नागपुरात या दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सीजेपीच्या नेहा बोरा यांच्याकडून देण्यात आली. दिल्लीतील आंदोलनानंतर देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने हा दौरा काढण्यात येत आहे.
सीजेपीचे दिल्लीतील आंदोलन
परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी, रोजगार आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवरून ‘सीजेपी’च्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे तरुणांच्या प्रश्नांबरोबरच शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार आणि सरकारी यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही चर्चा झाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ‘सीजेपी’ने आता देशभरातील तरुणांशी संपर्क साधण्यासाठी ‘जेन-झी रायझिंग टूर’ची घोषणा केली आहे. या दौऱ्याचा पहिला टप्पा नागपुरातून सुरू होत असल्याने विदर्भातील तरुणांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे.
नागपूरची निवड महत्त्वाची
विदर्भातील विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी नागपूर हे महत्त्वाचे केंद्र आहे. शहरात विविध शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. त्यामुळे शिक्षण, परीक्षा आणि रोजगाराच्या प्रश्नांवर आधारित या दौऱ्यासाठी नागपूरची निवड करण्यात आल्याने स्थानिक पातळीवर या उपक्रमाला किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे. ‘सीजेपी’कडून या दौऱ्याच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधण्याबरोबरच संघटनेचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. नुकतीच देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीमही सुरू करण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
‘सीजेपी’ची भूमिका काय?
कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) ही तरुणांच्या प्रश्नांवर आंदोलन आणि सामाजिक दबावगटाच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करणारी संघटना म्हणून पुढे आली आहे. परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्न हे संघटनेच्या प्रमुख मुद्द्यांमध्ये आहेत. ‘सीजेपी’चे प्रमुख चेहरे असलेल्या अभिजीत दीपके यांनी संघटना तातडीने निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नसून सध्या तरुणांच्या प्रश्नांवर सामाजिक दबाव निर्माण करण्यावर भर असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘सीजेपी’ने सात ऑगस्टलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना युवकांच्या शिक्षण, बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नांवर स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी करणारी ऑनलाइन याचिका सुरू केली आहे. त्यामुळे नागपूर दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
