वर्धा : देशातील युवकांचे दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलन केवळ देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधून घेत आहे. हे कसे? कारण या या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा बंद म्हणजे जगाशी संवाद संपलेला. पण आंदोलनाची धग तर सर्वत्र गेली पाहिजे, ही भावना. मग करायचे काय, या प्रश्नाचे उत्तर या सुविद्य या हुशार विद्यार्थ्यांनी अखेर शोधून काढलेच. त्यामुळे दिल्ली पोलीस पण चक्रावून गेले आहे.
परस्पर संवाद करण्याचे माध्यम
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या ‘संसद चलो’ आंदोलनादरम्यान सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव प्रशासनाने नवी दिल्लीतील काही भागांत मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली. इंटरनेट आणि टेलिकॉम नेटवर्क नसतानाही आंदोलकांनी आपापसात संपर्क कसा साधला ही उत्सुकतेची बाब ठरली. या आंदोलनात आंदोलकांनी विना-इंटरनेट काम करणाऱ्या ब्लूटूथ मेश मेसेजिंग ॲप्सचा वापर केल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आला. ते लक्षात येताच या तंत्रज्ञानाची सखोल चौकशी सुरू झाली आहे.
हे तंत्रज्ञान कसे काम करते?
व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा सिग्नल यांसारख्या प्रसिद्ध मेसेजिंग ॲप्सना मेसेज पाठवण्यासाठी ३G/४G/५G किंवा वाय-फाय (Wi-Fi) इंटरनेटची गरज भासते. परंतु, ब्लूटूथ आधारित मेसेजिंग ॲप्स ‘ब्लूटूथ लो एनर्जी’ या तंत्रज्ञानाचा वापर करतात.
या तंत्रज्ञानामध्ये फोन थेट टेलिकॉम टॉवर किंवा इंटरनेट सर्व्हरशी कनेक्ट होत नाही तर जवळच्या इतर उपकरणांशी ब्लूटूथद्वारे जोडला जातो. जर अनेक युझर्सनी हे ॲप डाऊनलोड केले असेल तर एक मोबाईल दुसऱ्या मोबाईलला मेसेज फॉरवर्ड करतो. याला ‘मेश नेटवर्क’ (Mesh Network) म्हटले जाते. एका मोबाईलपासून दुसरा मोबाईल अशा साखळीच्या माध्यमातून शेकडो मीटरपर्यंत किंवा गर्दीच्या ठिकाणी मेसेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पोहोचवता येते. आंदोलनाआधी आणि आंदोलनादरम्यान ‘संसद चलो’ मार्चमधील सहभागींना अशा प्रकारची ॲप्स डाऊनलोड करण्याचे आणि इंटरनेट बंद झाल्यास एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मेसेज पाठवण्यात आले होते.
इंटरनेट बंदिस चकवा
‘ब्रिजफाय’ किंवा ‘बिटचॅट’ यांसारख्या ब्लूटूथ मेश ॲप्सचा वापर करून आंदोलक पोलिसांच्या इंटरनेट बंदीला चकवा देऊन रणनीती आखत असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची आणि डिजिटल संभाषणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. हे मेसेजिंग ॲप्स केवळ वैयक्तिक संवादासाठी वापरले गेले की आंदोलनादरम्यान झालेली हिंसा आणि गोंधळ नियोजित करण्यासाठी वापरले गेले याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली असून सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन व्हिज्युअल्स आणि सर्व्हर-ॲप प्रदात्यांकडून माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जागतिक आंदोलनांमध्येही हे झाले
इंटरनेट बंदीच्या काळात अशा ब्लूटूथ मेश ॲप्सचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हाँगकाँग, म्यानमार, युक्रेन आणि नेपाळमधील मोठ्या आंदोलनांमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी टेलिकॉम नेटवर्क ठप्प झाल्यावर या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. आता दिल्लीतील CJP आंदोलनामुळे ही ऑफलाइन मेसेजिंग पद्धत पुन्हा एकदा भारतात चर्चेचा विषय ठरली आहे.
