लोकसत्ता टीम
अकोला : स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक तथा भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोल्यातील सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी गोंधळ घातला. कार्यक्रमात धक्काबुक्की, घोषणाबाजी करून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. या राड्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भारत जोडो अभियानांतर्गत योगेंद्र यादव यांच्या विचारसभेचे आयोजन सोमवारी दुपारी शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनाच्या सभागृहात करण्यात आले होते. या विचारसभेमध्ये योगेंद्र यादव यांचे भाषण सुरू असतांना सभागृहात उपस्थित वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मते काँग्रेसकडे वळली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने आरक्षण विरोधी भूमिका घेतली आहे. आरक्षण संपवण्याची भाषा काँग्रेस करीत असतांना त्यांना मतदान कसे करावे? असा प्रश्न योगेंद्र यादव यांना वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला.
आणखी वाचा-नागपूर : फडणवीस सहाव्यांदा; बावनकुळे, खोपडे चौथ्यांदा अन्…
महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपला मतदान केले. त्यावर काँग्रेसने कुठलीही कारवाई केली नाही. भाजपविरोधी मत व्यक्त करतांना मतदारांनी मतदान कुणाला करावे, यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावरून विचारसभेमध्ये मोठा वाद निर्माण झाला. दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. वंचितच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की केली. विचारसभेच्या आयोजकांनी सुरक्षेचा घेराव करून योगेंद्र यादव यांना सभागृहातून बाहेर काढले. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसला समर्थन करण्याच्या त्यांच्या भूमिकाचे तीव्र निषेध करण्यात आला. या सर्व गोंधळामुळे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आणखी वाचा-काँग्रेससमोर पेच; मुस्लीम की हलबा उमेदवार?
योगेंद्र यादव यांनी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी अकोल्यात विचारसभा घेतली. काँग्रेसची आरक्षण विरोधी भूमिका आहे. त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाने आरक्षण विरोधात वक्तव्य केले. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी भाजपला मतदान केले. या परिस्थितीत मतदारांनी काँग्रेसला मतदान कसे करावे? हे योगेंद्र यादव यांनी स्पष्ट करायला हवे होते. भाजपला विरोध असतांना पर्याय काय? यासंदर्भात आम्ही त्यांना विचारणा केली. मात्र, ते एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. -डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.