नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नाग, पिवळी आणि पोहरा या नद्यांसह नाल्यांच्या सफाई अभियानाचा मंगळवारी कुठलाही गाजावाजा न करता शुभारंभ करण्यात आला. महापालिका आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी बेलतरोडी रोडवरील पोहरा नदीवर पारंपरिक पद्धतीने जेसीबीची पूजा करून अभियानाचा प्रारंभ केला. यावर्षी नदी स्वच्छता अभियान दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. सहा उपभागांमधील नालेसफाईच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून दुसरा टप्पा १ मेपासून सुरू होणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी नदी-नाल्यातील ०.८-१.५ लक्ष मेट्रिक टन गाळ काढला जातो. यावर्षी नदी स्वच्छता अभियानांतर्गत नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाण्यासाठी सुरळीत प्रवाह केला जाईल. यामुळे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नदी काठावर वसलेल्या वस्त्यांची पुरापासून सुरक्षादेखील होईल. पिवळी नदीची लांबी १७ किमी, नाग नदीची लांबी १७.७५ किमी आणि पोहरा नदीची लांबी १२ किमी आहे. नदी स्वच्छता अभियान प्रत्येक वर्षी लोक सहभागातून राबवण्यात येते. अभियानात गैर शासकीय संस्थांचे सहकार्य घेतले जाईल. नद्याव्यतिरिक्त हत्तीनाला गड्डीगोदाम, बाळाभाऊ पेठ, बोरीयापूर, डोबीनगर, लाकडीपूल, तकीया, नरेंद्रनगर, बुरड, यासह एकूण २३२ नाले शहरात आहेत. यापैकी नदी व मोठय़ा नाल्यांची स्वच्छता ही मशीनद्वारे केली जाणार आहे. नाले सफाई मोहीमदेखील सुरू करण्यात आली आहे. शहरातील तिन्ही नद्यांसह सर्व नाल्यांची योग्य व व्यवस्थित स्वच्छता व्हावी, यावर लक्ष दिले जात आहे. विहित कालावधीमध्ये नदी व नाले स्वच्छता अभियान पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य देण्यात आले आहे. स्वच्छतेदरम्यान नदीतून काढला जाणारा गाळ, माती तशीच पडून राहू नये याबाबत विशेष काळजी घेणे, या मातीचा उपयोग वृक्षलागवडीसाठी करणे, नदी व नाल्यांमधील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये, याची काळजी घेणे या सर्व बाबींकडे लक्ष दिले जाणार आहे. ही माती ज्यांना हवी असेल त्यांना दिली जाईल.