scorecardresearch

यवतमाळ: निसर्गातील बदलावरून लावा पावसाचा अंदाज; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना कानमंत्र

निसर्गातील अनेक घडामोडी मानवाला संकटाची आणि चांगल्या घटनांचीही चाहुल देत असतात. पाऊस कधी व किती पडणार, दुष्काळ पडणार का, आदी प्रश्नांची उत्तरे निसर्ग अचूक देतो.

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख Meteorologist Punjabrao Dakh
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (Courtesy: Facebook)

निसर्गातील अनेक घडामोडी मानवाला संकटाची आणि चांगल्या घटनांचीही चाहुल देत असतात. पाऊस कधी व किती पडणार, दुष्काळ पडणार का, आदी प्रश्नांची उत्तरे निसर्ग अचूक देतो. मात्र ते समजून घेण्यासाठी निसर्गवाचन व निरीक्षण गरजेचे आहे. निसर्गाच्या निरीक्षणावरून शेतीचे नियोजन कसे करायचे, पावसाचा अंदाज कसा लावायचा याचा, कानमंत्रच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून यवतमाळातील शेतकऱ्यांना मिळाला.

यवतमाळात आयोजित कृषी महोत्सवातील समारोपीय कार्यक्रम डख यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला. गेल्या पाच ते सात वर्षापासून प्रत्येक ऋतू हा किमान २२ दिवसांनी पुढे सरकला आहे. त्यामुळे पूर्वी ७ जूनला सुरू येणारा मान्सून आता जूनच्या अखेरच्या आठवड्यात दाखल होतो. या बदलामुळे गेल्या काही वर्षांपासून पेरणीसुद्धा जूनच्या अखेरच्या आठवड्यातच सुरू होते, असे डख म्हणाले. महाराष्ट्रात मुंबईकडून मान्सून दाखल झाला तर पाऊस कमी पडतो. मात्र गेल्या चार वर्षांपासून पावसाने आपली दिशा बदलल्याचे निरीक्षण डख यांनी नोंदविले. आता पाऊस पूर्वेकडून दाखल होत असल्याने महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा >>>चंद्रपूर: हजारावर पंचनाम्यामध्ये फेरबदल, पीक विमा कंपनीचे पितळ उघड; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

निसर्ग असा देतो पावसाचा अंदाज…

पूर्वी तंत्रज्ञान नव्हते तरी लोक निसर्गातील बदलावरून पावसाचा, हवामानाचा अंदाज बांधायचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निसर्गातील बदलाचे सुक्ष्म निरीक्षण करण्याची सवय लावून घ्यावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी काही नोंदी ठेवण्याच्या सूचना डख यांनी केल्या.जून महिन्यात दिवस मावळताना पूर्व दिशेला आकाश लाल-तांबडे झाले तर त्यानंतर तीन दिवसांत पाऊस येणार असे समजावे. चिमण्या मातीत लोळू लागल्या तर चार दिवसात पाऊस येतो. जून महिन्यात पहिल्या आठवड्यात सूर्य उगवताना सूर्याजवळ ढग जमा झाले आणि त्याला तपकिरी रंग आला की त्यापुढील १० दिवसांत निश्चित पाऊस कोसळतो. मे महिन्यात सारखे जोराने वारे वाहू लागतात. हे वारे थांबल्यावर साधारण एक महिन्यात मान्सून, पाऊस दाखल होतो. डोंगर जवळ आल्यासारखे दिसतात तेव्हा २४ तासांत पाऊस येतो. मे महिन्यात अखेरच्या पंधरवड्यात अवकाळी पाऊस झाल्यास, ते हमखास पाऊस कोसळणार असल्याचे चिन्ह आहे.

हेही वाचा >>>नागपूर: उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर ठेवला बॉम्ब?पोलीस नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन

याशिवाय झाडेही पावसाचा अंदाज वर्तवितात असे डख यांनी सांगितले. ज्यावर्षी कडूनिंबाला उन्हाळ्यात भरपूर निंबोळ्या लागल्यात त्यावर्षी खूप पाऊस येतो. तर बिब्याच्या झाडाला खूप फुले लागणे, गावरान आंब्याचे अधिक उत्पादन होणे, हे दुष्काळी स्थितीचे चिन्ह असल्याचे निरीक्षण नोंदविल्याचे डख यांनी सांगितले. मात्र चिंचेचे झाड चिंचांनी लदबदले तर ते वर्ष अधिक उत्पन्न देणार असल्याची सूचना असते, असे ते म्हणाले. पशु-पक्षांच्या वर्तनावरूनसुद्धा पावसाचा अंदाज लावता येत असल्याचे डख यांनी सांगितले. कावळ्याने झाडाच्या शेंड्यावर घरटे केले त्यावर्षी पाऊस कमी होतो, तर मध्यभागी घरटे बांधले तर पाऊस अधिक होत असल्याचे चिन्ह आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सरड्याने डोक्याचा रंग लाल केला तर १० दिवसांत पाऊस येतो. चातक पक्षाने पेरते व्हा, पेरते व्हा अशी शीळ घालायला सुरुवात केल्यानंतर २० दिवसांत हमखास पाऊस येतो, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे अतिवृष्टी
पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. झाडे नसली तरी पाऊस पडतो, मात्र हा पाऊस ढगफुटीसारखा पडतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करतो, असे डख म्हणाले. जास्त झाडे असणाऱ्या ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळतो. हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असतो. त्यामुळे अधिकाधिक झाडे लावा आणि पृथ्वीचे तापमान कमी करून पावसाचे संतुलख राखा, असा सल्ला पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 17:44 IST

संबंधित बातम्या