नागपूर : मेंदूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंची कमी नाही. त्यापैकी अनेक संसर्गाला हवामान बदल कारणीभूत आहे. या आजारावर नियंत्रणासाठी देशात प्रथमच हवामान बदल आणि मेंदू संसर्गावर मोठा अभ्यास होणार आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
वाढते तापमान, बदलते ऋतुचक्र आणि वाढते वायू प्रदूषण यांचा मानवी आरोग्यावर नेमका किती आणि कसा परिणाम होतो, याचा शोध घेण्यासाठी देशात पहिल्यांदाच व्यापक स्वरूपाचा बहुकेंद्रित अभ्यास हाती घेण्यात आला आहे. हवामान बदल आणि मेंदू संसर्ग यांचा परस्परसंबंध तपासण्यासाठी देशातील अकरा अग्रगण्य वैद्यकीय व शैक्षणिक संस्थांचा सहभाग असलेला हा राष्ट्रीय उपक्रम राबवण्यात येत आहे.
मध्य भारतातील जबाबदारी नागपुरातील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (सिम्स) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या प्रगत संशोधन केंद्र कार्यक्रमांतर्गत त्यास पाठबळ देण्यात आले आहे.
काय तपासले जाणार?
वाढते तापमान आणि वायू प्रदूषणामुळे मेंदूज्वर, एन्सेफलायटिससारख्या गंभीर मेंदू संसर्गांचे प्रमाण आणि तीव्रता वाढते का, याचा सखोल अभ्यास या प्रकल्पातून केला जाणार आहे. हवामानातील बदल, वायू गुणवत्तेची नोंद आणि रुग्णालयांतील वैद्यकीय माहिती यांचा तुलनात्मक अभ्यास करून संभाव्य धोक्याची पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याचाही प्रयत्न होणार आहे.
सिम्स रुग्णालयातील संशोधन प्रकल्प प्रमुख डॉ. राजपाल सिंह कश्यप यांनी सांगितले की, हवामान बदल आणि मेंदू संसर्ग यांचा संबंध उलगडण्याचा हा देशातील पहिलाच व्यापक प्रयत्न आहे. वाढते तापमान, तीव्र उन्हाळा आणि ठळक ऋतुजन्य बदल यामुळे नागपूर हे अभ्यासासाठी महत्त्वाचे केंद्र ठरते.
सिम्सची भूमिका का महत्त्वाची?
सिम्समध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे मध्य भारतातील हवामान आणि आरोग्याचा संबंध अभ्यासण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरते. या प्रकल्पासाठी सिम्सकडून मागील दहा वर्षांतील मेंदू संसर्गग्रस्त रुग्णांची माहिती तसेच येत्या पाच वर्षांतील रुग्णांची नोंद उपलब्ध करून दिली जाणार आहे. निदान चाचण्यांचे निष्कर्ष आणि स्थानिक पर्यावरणीय घटकांशी संबंधित वैद्यकीय निरीक्षणेही या संशोधनाचा भाग असतील.
भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणार?
डॉ. व्ही. एस. अग्रवाल यांनी सांगितले की, देशभरातील अकरा केंद्रांच्या समन्वयातून होणारा हा अभ्यास भविष्यात मेंदू संसर्गांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. डॉ. अमित नायक यांच्या मते, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेला सज्ज ठेवण्यासाठी या संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरसह देशातील अकरा केंद्रांत सुरू झालेला हा अभ्यास भविष्यातील आरोग्य धोरणांसाठी दिशादर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
