अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शहरांच्या विकासासाठी विविध प्रभावी योजना राबविल्या जातात. केंद्र व राज्य सरकारच्या कार्यामुळे आता शहरी जीवनमान उंचावले जात आहे. शहरांचा विकास साधण्यासाठी भाजपकडेच विकासाची रुपरेषा असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खा. अनुप धोत्रे, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, विजय अग्रवाल, गिरीश जोशी आदींसह उमेदवार व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीमध्ये कोणावर टीका करणार नसून विकासाच्या मुद्द्यावर भूमिका मांडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिवरखेड ग्राम पंचायतची नगर पंचायतीमध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला स्थगिती देऊन थेट नगर पालिका केली. राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे. तेल्हारा व अकोटमध्ये तर भाजपचे फार जुने कार्य आहे. परिसरातील सिंचन प्रकल्पासाठी भरीव निधी दिला. अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे या भागाला मोठा फायदा होणार आहे.
अन्न, वस्त, निवारा, शिक्षण व आरोग्यासाठी गावातून नागरिक शहरात येतात. देशात वर्षानुवर्षे शहरीकरणाला अभिशाप मानले गेले. शहरांतील जीवन बकाल झाले. देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावासह शहराच्या विकासासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वात शहरी विकासाचा आराखडा तयार आहे. सरकारने शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. अमृत सारख्या योजनांतून लाखो कोटी रुपये दिले. मुबलक पिण्याचे पाणी, भुयारी गटार, पाणी प्रक्रिया, घनकचऱ्यातून प्रक्रिया, गरीबांना जमिनीचा पट्टा, अडीच लाखाचे घर, आयुष्यमानमधून मोफत उपचार, शाळा, अंगणवाड्या डिजीटल होण्यासाठी त्यांनी काम केले. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान बदलले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात साडेसहा कोटी लोक ४० हजार गावांमध्ये, तर तेवढेच लोक ४०० शहरात राहतात. शहरी जीवनमानात परिवर्तन घडवून आणायचे आहे. त्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली. राज्यात सौर प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज मिळेल. विकासाची आता सुरुवात झाली. त्यासाठी केंद्र, राज्याप्रमाणे नगर पालिकेची सत्ता देखील आपलीच हवी. दुसरे कोणी आले तर पाठवलेल्या पैशांचे काय होईल, हे सांगता येत नाही, असे देखील देवेंद फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पहिलेच मुख्यमंत्री ठरले
हिवरखेडच्या भूमीवर आलेले देवेंद्र फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी एक हजार कोटींची विकास कामे परिसरात मंजूर केली आहेत. धरणाचा लाभ स्थानिकांना मिळत नसल्याने पाण्याचे आरक्षण काढण्याची गरज आ. भारसाकळे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. त्यावर हक्कचे पाणी दुसऱ्याला घेऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
