पुणे शहराच्या कचरा प्रश्नाबाबत तातडीने बैठक घेऊन कचराकोंडी फोडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर शहरातील भांडेवाडी कचराघरामुळे वायू आणि प्रदूषणाने त्रस्त लोकांच्या प्रश्नावर बैठक घेण्यास वेळ मिळालेला नाही. विरोधी पक्षात असताना त्यांच्याच पक्षाने या प्रश्नावरून आंदोलन केले असल्याने त्यांना याबाबतच्या तीव्रतेची जाण आहे, तरीही त्यांनी सुरू केलेला कानाडोळा आश्चर्य व्यक्त करणारा आहे.

पुण्याजवळील उरूळी तसेच फुरसुंगी गावातील लोकांनी कचराघराच्या त्रासामुळे आंदोलन केले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने रविवारी ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी पुणे शहराच्या कचरा प्रश्नाबाबत एका महिन्यात र्सवकष आराखडा करण्याचे आश्वासन दिले, परंतु भांडेवाडी कचराघरामुळे सुमारे २५ हजार लोकांची होत असलेल्या दैनावस्थेची कल्पना असताना त्यासाठी त्यांना अद्याप वेळ देता आलेला नाही.

गृहशहरातील कचराघराचा गंभीर प्रश्न असताना आणि त्या मुद्यांवरून कधीकाळी आंदोलन केलेले असताना मुख्यमंत्र्यांनी भांडेवाडी कचराघराची समस्या तडीस नेण्यास गेल्या अडीच वर्षांत बैठक घेतलेली नाही. दुसरीकडे पुण्याजवळील कचराघराबद्दल बैठक घेवून सकारात्मक पावले टाकली आहे. मुख्यमंत्र्यांना शहरातील या प्रश्नांची जाण असताना त्यासाठी वेळ काढला नसल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.

भांडेवाडी कचराघरामुळे वायू आणि जल प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर झाले. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) भांडेवाडी परिसरात असलेल्या घातक वायूवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने देखील गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने तर महापालिका आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला दंड केले आहे.

भांडेवाडीला वारंवार लागत असलेल्या आगीमुळे सुमारे ३ किमी परिसरातील रहिवाशांची जीवन असह्य़ झाले आहे. या वायू आणि जलप्रदूषणामुळे परिसरातील लोकांना विविध आजार झाले आहेत. यासंदर्भात लोकसत्ताने विशेष वृत्त मालिका प्रकाशित केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री हे विरोधी पक्षात असताना भांडेवाडीची प्रदूषण पातळी घटवण्यासाठी आणि भांडेवाडी गावाबाहेर नेण्यासाठी आग्रही भूमिका घेत होते. त्यामुळे येथील नागरिकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. परंतु पुण्याजळील कचराघरावर बोलणारे फडणवीस हे नागपुरातील कचराघराबद्दल मौन बाळगून असल्याने येथील लोकांमध्ये नाराजी आहे.