नागपूर : राज्यात अनेक ठिकाणाहून निवडणूकीनंतर बोटावरील शाई निघून जात असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या ‘मार्कर पेन’बाबत हरकत घेतली.
मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेत ‘मार्कर पेन’ आताच वापरात नाही, तर यापूर्वी देखील अनेकदा तो वापरण्यात आल्याचे सांगितले. विरोधकांना शंकाच असेल तर आयोगाने दुसरा पेन वापरावा. ते सुद्धा जाऊ द्या, ‘मी तर म्हणतो, ऑईल पेंट वापरावा’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर कोणत्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य असल्याचे ठामपणे सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या ‘मार्कर पेन’विषयक आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, निवडणुकीशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतले जातात आणि यापूर्वीही अनेक वेळा अशाच प्रकारचा पेन वापरण्यात आला आहे.
मार्कर पेनबाबत कोणाला आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी, असे सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली. या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा करत, आमचे विरोधक उद्या पराभवाचे कारण काय सांगायचे याची आजच प्रॅक्टिस करत आहेत, असेही ते म्हणाले. पॅड युनिटबाबत होत असलेल्या आरोपांवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, काही नेत्यांनी त्याला ‘पाडू युनिट’ असे नाव दिले आहे.
मात्र, ही यंत्रणा अचानक आणलेली नाही. राज्य निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून या मशीनची माहिती दिली होती. मतमोजणीदरम्यान मशीन बंद पडल्यासच या युनिटमधील डेटाचा वापर केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाया असल्याचे नमूद करत फडणवीस यांनी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान हा केवळ अधिकार नाही, तर कर्तव्यही आहे. मतदान न करणे म्हणजे लोकशाहीतील कर्तव्याचे पालन न करणे. चांगली शहरे घडवायची असतील तर राज्यातील सर्व २९ महापालिकांमधील मतदारांनी उत्स्फूर्त मतदान करावे, असे ते म्हणाले.
दरम्यान, पश्चिम नागपुरातील भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना मुख्यमंत्री म्हणाले की, अतिशय वाईट प्रकारे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. लोकशाहीत निवडणुकीत जिंकता येत नाही म्हणून ठोकशाहीचा मार्ग स्वीकारला जात आहे. मात्र कितीही हल्ले झाले तरी आमचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
