नागपूर : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि कथित मतचोरीविरोधात सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर नागपुरात जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस पार्टीने जे सुरू केले आहे, ते पूर्णपणे संविधान विरोधी आहे, असा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोराडी येथील नैवेद्यम सभागृहात बैठक घेतली. तत्पूर्वी ते प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. ते म्हणाले, संविधान हातात घेऊन संविधानिक संस्थांना बदनाम केले जात आहे. निवडणूक आयोग, आरबीआय, सीएजी अशा सर्व संस्था कुचकामी असल्याचे दाखवले जात आहे. लोकांना या संस्थांच्या विरोधात चिथावणी देऊन, या संस्था तुम्हाला न्याय देऊ शकत नाही अशी भावना तयार केली जात आहे. काँग्रेस व राहुल गांधी यांना भारताचे संविधान नाकारून या देशात अति डावी सत्ता प्रस्थापित करायची आहे, असा आरोप त्यांनी केला.

संविधानाला नाकारण्याचा डाव

भारताच्या संविधानाला नाकारण्याचे काम राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने आज केले आहे. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणे, सरन्यायाधीश यांनी रस्त्यावर येऊन ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा ही मंडळी व्यक्त करत आहे. मात्र, हे कोणत्या संविधानात लिहिले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालय ‘सेपरेशन ऑफ पॉवर’प्रमाणे वेगळे आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशीही चर्चा करता येत नाही, निवेदन स्वीकारता येत नाही. त्यांचा अधिकार याचिकेवर सुनावणी करण्याचा आहे. मात्र जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा घणाघात त्यांनी केला.

संविधानाच्या पाठीराख्यांना सवाल

जे संविधानाचे पाठीराखे म्हणवतात, त्यांनीच सांगावे, सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने एखाद्या मोर्चाला सामोरे जाणं हे भारतीय संविधानाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे का, असा सवाल त्यांनी केला. सरन्यायाधीशांनी भेटता येणार नाही, याचिका केली तर त्याची सुनावणी घेऊ असे सांगितले. मात्र आता सोशल मीडियावर सरन्यायाधीश यांच्याविरोधात शिवीगाळ केली जात आहे. एकप्रकारे सर्वोच्च न्यायालय कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

इंदिरा गांधी यांच्या संविधान नाकारण्याच्या पावलावर राहुल गांधी

फडणवीस म्हणाले, राहुल गांधी संविधान नाकारण्याचेच प्रयत्न करीत आहे. १९७५ मध्ये राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी यांनीही संविधानात संशोधन करून मूलभूत अधिकार नाकारले होते आणि त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्गही बंद केला होता. आम्ही त्या विरोधात संघर्ष केला आणि संविधान पुन्हा प्रस्थापित केले. यांनी आता संविधानाशी खेळ केले, संविधाननाची प्रत दाखवून कितीही आंदोलन उभे केले, तरी आम्ही बाबासाहेबांचे संविधानाला हात लावू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आंदोलनासाठी विदेशातून पैशाच्या रसदची शक्यता

जंतर-मंतरवर अराजकता सुरू होती. तेव्हा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध पोस्ट मोठ्या संख्येने येत होत्या. संसदीय समितीने काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधी यांना बोलावून चौकशी केली. अनेकांनी पोस्ट बूस्ट करण्यासाठी पैसा मिळत होता, असे संगितले. हा पैसा परदेशी असू शकते असेही त्यांनी मान्य केल्याचे फडणवीस म्हणाले.

सातत्याने पराभवामुळे काँग्रेस धास्तावली

काँग्रेस सातत्याने हरल्यामुळे आणि पुढे जिंकण्याची शक्यता नसल्यामुळे धास्तावली आहे. देशातील अनेक राज्यात अनेक वर्षांपासून लोकांनी काँग्रेसला नाकारले आहे. तामिळनाडूत ५९, पश्चिम बंगालने ५०, सिक्कीमने ४२ वर्षांपासून, उत्तरप्रदेशने ३७, बिहारने ३६, त्रिपुराने ३३, गुजरातने ३१, ओरिसाने २६ वर्षांपासून काँग्रेसला नाकारले असून या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या कुबड्यावर काँग्रेस आहे. त्यामुळे ते कसेही करून सत्तेत येऊ पाहात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.