नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी टिपू सुलतान यांची तुलना केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपकाळ यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी कॉंग्रेसची लाज काढली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना खपवून घेतली जाणार नाही. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे अतिशय निंदनीय आहे. कॉंग्रेसला लाज वाटायला पाहिजे, अशा तीव्र शब्दात फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. त्यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता जोडे चाटण्याची ही पद्धत जन्मात पाहिली नाही, असे सांगितले. ते म्हणाले, छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त केले. त्याचवेळी हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतानची तुलना करून दोघांनाही सारखाच सन्मान देणे म्हणणे म्हणजे जोडे चाटणे या जन्मात बघितले नाही. हे खपवून घेतले जाणार नाही.

या तुलनेसाठी सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचे आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला, अगदी त्यांच्याच मंदियाळीत बराच कालावधी लोटल्यानंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. ते भारताचे भूमीपुत्र होते, असे वक्तव्य सपकाळ यांनी केले होते.

मुलुंडमधील घटना दुर्देवी, राज्य सरकार चौकशी करणार

मुलुंड येथे मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या पिलरचा भाग रिक्षावर कोसळला. यात एकाचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दखल घेतली असून जखमींवर उपचार करण्यात येत असून राज्य शासनाकडून मदत केली जाईल, असे त्यानी सांगितले. मृत व्यक्तिला राज्य शासनाकडून मदत केली जाईल तसेच याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. मेट्रो स्टेशनच्या पिलरमधील सिमेंटचा भाग उंचावरुन खाली कोसळल्याने दुर्घटना झाली. मुलुंड पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री रोडवर जॉनसन अँड जॉनसन कंपनीच्या जवळ मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असताना हा प्रकार घडला.

हा स्लॅब थेट या वाहनांवर कोसळल्याने रिक्षा आणि कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी काम करताना आवश्यक काळजी घेतली गेली की नाही, याबाबत चौकशी करण्यात येईल तसेच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमुद केले. यापुढे सुरक्षेसंबंधी अंकेक्षण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.