नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा अजून आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान विदर्भातील अनुशेषबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे बघायला मिळालं, अखेर अध्यक्षांनी हस्तक्षेप करत दोघांनााही शांत केलं.
नेमकं काय घडलं?
विदर्भातील अनुशेषाबाबत बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख केला. ज्यावेळी मी एमएसआरडीसीचा मंत्री होतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मात्र, माझ्या खात्याकडे तेव्हा काहीही काम नव्हतं. तेव्हा मी देवेंद्र फडणवीसांना म्हणालो, की मी काम करणारा कार्यकर्ता आहे. पण माझ्याकडे सध्या काहीही काम नाहीये. तेव्हा त्यांनी मला समृद्धी महामार्गाची जबाबदारी दिली. याबाबत जिंतेंद्र आव्हाडांना माहिती होतं. तेव्हा ते मध्ये-मध्ये समृद्धी महामार्ग दिलाय असं बोलायचे, असे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर जिंतेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला, मी असं कधी म्हणालोच नव्हतो, असं ते म्हणाले. त्याला प्रत्युत्तर देताना, मी चांगलं बोलायला गेलं तरी तुम्हाला आवडत नाही, अशी खोचक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद बघायला मिळाला. अखेर अध्यक्षांनी हस्तक्षेप करत हा दोघांनाही शांत केलं.
हेही वाचा – भ्रष्टाचाराचे आरोप केवळ शिंदे गटाच्या मंत्र्यांवर, भाजपाच्या नाही; उद्धव ठाकरे म्हणाले, “याचा अर्थ…”
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला. “गेली दोन वर्षे विदर्भात अधिवेशन झालं पाहिजे, अशी मागणी करण्यात येत होती. सरकार बदललं नसते तर विदर्भात अधिवेशन झालं नसते. चीन, कोरीया आणि जपानमध्ये वाढत्या रुग्णांचा निकष इकडे लावला असता. अजित पवारांना माहिती, लॉकडाऊन आणि करोना कोणाच्या आवडीचा विषय आहे,” असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.