नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस अंतिम निर्णय घेईल, त्या निर्णयाच्या पाठीशी राज्य सरकार व भाजप राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात स्पष्ट करीत सुनेत्रा पवार यांच्या नावाला हिरवी झेंडी दाखवली. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी हालचालींनाही राजधानीत वेग आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी नागपुरात पोहोचले. ते थेट गडकरी यांच्या निवासस्थानी गेले. येथे नागपूरच्या महापौरपदावर चर्चा झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. नागपूरच्या महापौरपदाबाबत रुपरेषा ठरविण्यात आली असून नावे ठरल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ही नावे त्यांनी गुलदस्त्यातच ठेवली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील परिस्थिती व हालचालीबाबत त्यांनी स्पष्टच सांगितले. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी कॉंग्रेस घेईल. त्यांचे जे निर्णय असेल, त्याला आमचे समर्थन राहील.
माझ्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोनदा चर्चा केली. परंतु अंतिम निर्णय त्यांचा राहील, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या, शनिवारी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सुनेत्रा पवार गेल्या काही वर्षांपासून त्या प्रचारादरम्यान अजित पवारांसोबत दिसल्या होत्या. त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणुकही लढवली होती, मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. त्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत आणि राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच त्या बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्षा देखील आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्यात सक्रिय सहभागी नोंदवलेला आहे.
२०१० मध्ये सुनेत्रा पवार यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली. ही संस्था सेंद्रिय शेती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी काम करते. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर एक मोठा विक्रम होणार आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. या आधी कोणत्याही महिलेने या पदावर काम केलेले नाही. पवार घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालवण्याचे काम आता त्या करणार आहेत.
अर्थसंकल्पही सादर करणार
अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची तयारी केली होती. काही प्रक्रिया राहीली आहे, त्यात मी लक्ष घालत आहे. वेळेवर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमुद केले. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते अर्थसंकल्प सादर करतील, असे संकेत मिळत आहे.

