नागपूर : महानिर्मितीमध्ये कोळसा धुण्याच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू आहे. कोल वॉशरीजचे सर्व कंत्राटदार भाजपच्या जवळचे आहेत. या व्यवहारातून कमावलेल्या काळ्या पैशातून हल्ली आमदार विकत घेण्याचे प्रयत्न होत आहेत, असा गंभीर आरोप नागपुरातील जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाने निविदा प्रक्रिया करून कोल वॉशरीजमध्ये कोळसा धुण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खनिकर्म महामंडळाने प्रक्रिया करून विशिष्ट लोकांनाच कोळसा धुण्याचे कंत्राट दिले. परंतु, काळ्या यादीतील गुप्ता कोलसह इतर कंपन्यांतील अधिकारीच या वॉशरीजमध्ये दिसतात. त्यामुळे छुप्या पद्धतीने हे कंत्राट काळ्या यादीतील लोकांना दिलेले दिसते. दरम्यान, आमदार ॲड. आशीष जयस्वाल हे तत्कालीन सरकार असल्यापासून खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत.

जयस्वाल यांच्या काळातच हे कोल वॉशरीजचे कंत्राट त्यांच्या व भाजपशी जवळीक असलेल्यांना दिले गेल्याने त्यांचीही भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे तत्काळ त्यांची या पदावरून हकालपट्टी करून सखोल चौकशी करण्याची मागणीही प्रशांत पवार यांनी केली. या कोल वॉशरीजला महानिर्मितीचा नाकारलेला कोळसा केवळ ६०० रुपयांत दिला जातो. प्रत्यक्षात त्याची खुल्या बाजारात किंमत ८ ते १० हजार रुपये मेट्रिक टन आहे.

त्यामुळे हा काळा पैसा आमदार विकत घेण्यासाठी वापरला जात असल्याचाही आरोप प्रशांत पवार यांनी केला. कोल वॉशरीजच्या भ्रष्टाचाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. पोलिसांना नुकतेच माझे लेखी बयानही घेतल्याचे पवार म्हणाले. या विषयावर दोन दिवसांत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचीही भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.